Ukraine-Russia War: अभिनेत्री Priyanka Chopra ने दर्शवला युक्रेनला पाठींबा; जागतिक नेत्यांना केले 'हे' आवाहन (Watch Video)
Priyanka Chopra (Photo Credits: Instagram/@team_pc)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती सामाजिक समस्यांशी संबंधित पोस्ट शेअर करताना दिसते. आता प्रियंकाने युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात उघडपणे युक्रेनचे समर्थन केले आहे. यासोबतच तिने युक्रेनच्या निर्वासितांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. प्रियंका चोप्राने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने जागतिक नेत्यांना युक्रेनसह पूर्व युरोपमधील निर्वासितांना आणि मुलांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

प्रियंका म्हणते, ‘रशिया-युक्रेन संकटामुळे मुले मोठ्या प्रमाणावर घर सोडून इतर ठिकाणी निवारा शोधत आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर एवढ्या मोठ्या संख्येने मुले विस्थापित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जागतिक नेत्यांनो, तुम्ही मानवतावादी आणि निर्वासित संकटाच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आणि वकिलांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे. युक्रेन आणि जगभरातील विस्थापित लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे.’

प्रियंका पुढे म्हणते, ‘एकूण दोन दशलक्ष मुलांना सुरक्षेच्या नावाखाली सर्व काही सोडून शेजारच्या देशांमध्ये जाण्यास भाग पाडले गेले आहे. 2.5 दशलक्ष मुले युक्रेनमध्ये अंतर्गतरित्या विस्थापित झाली आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेले हे सर्वात मोठे विस्थापन आहे. ही संख्या धक्कादायक आहे. यामुळे अनेक मुलांच्या मनावर विपरीत परिणाम झाला आहे, ते पाहिल्यासारखे कधीच होऊ शकणार नाहीत. मुले सध्या जे दृश्य पाहत आहेत, अनुभवत आहेत, ते कधीही विसरणार नाहीत.’

व्हिडीओच्या शेवटी प्रियंका म्हणते, ‘यूके, जर्मनी, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांनो ज्याप्रमाणे तुम्ही मानवतावादी मदतीसाठी पैसे देता, तसेच तुम्ही निर्वासितांसाठी उभे राहाल का? तुम्ही अब्जावधींचे योगदान द्याल का? त्यांना खरोखरच या रुपयांची गरज आहे. मी हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती करते की त्यांनी हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करावा.’ (हेही वाचा: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले मदतीचे आवाहन)

दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केली. तेव्हापासून युद्धाची भयानक चित्रे जगासमोर सातत्याने येत आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले असले तरी युद्ध अद्याप थांबलेले नाही.