रशिया - युक्रेन | PC: AIR News

वर्षभरापासून रशिया- युक्रेन (Ukraine Russia Conflict) यांच्यामध्ये ताणलेले संबंध आजही कायम आहे. आता पुन्हा दोघांकडून हल्लेखोरी सुरू झाली आहे. रशियानं (Russia) काल (10  ऑक्टोबर) यूक्रेनच्या (Ukraine) प्रमुख शहरांवर 84 क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे.यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. यूक्रेन विरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर रशियानं केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.

यूक्रेनची राजधानी कीव इथल्या वर्दळीच्या चौकांत, उद्यानांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर हे हवाई हल्ले करण्यात आले. पश्चिम यूक्रेनच्या लवीव, तरनोपिल आणि झाइतोमिर, मध्य यूक्रेनमध्ये दनिप्रो आणि क्रेमेनचुक, दक्षिण भागात झेपरीझ्झिया आणि पूर्व भागात खारकीव इथं स्फोट झाल्याचं वृत्त आहे. विद्युत संयंत्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या अनेक भागांतला वीज पुरवठा खंडित झाला आहे. या संदर्भात अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि जी-7 नेत्यांची आज दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक होणार आहे.

पहा ट्वीट

दरम्यान यूक्रेनमधील युद्धजन्य स्थिती पाहता भारतीय नागरिकांनी युक्रेनचा प्रवास टाळावा असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. युक्रेन सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचं भारतीयांनी पालन करावं, तसंच आपल्या वास्तव्याबाबत भारतीय दूतावासाला माहिती द्यावी असं आवाहनही सरकारनं केलं आहे.