Ukraine: युक्रेनमध्ये सशस्त्र व्यक्तीने बसमधील 20 लोकांना ताब्यात घेऊन ठेवले ओलिस; व्यक्तीकडे स्फोटके असल्याचा संशय
Gun (Photo Credits: IANS)

युक्रेन (Ukraine) मध्ये मंगळवारी एका सशस्त्र व्यक्तीने (Armed Man) एक बस थांबवत त्यातील 20 लोकांना ओलीस ठेवले आहे. पोलिसांनी या घटनेची पुष्टी करत सांगितले की, आरोपीकडे हँड ग्रेनेड म्हणजे स्फोटके (Explosives) देखील असू शकतात. राजधानी कीव (Kiev) पासून सुमारे 400 किमी अंतरावर लस्क (Lutsk) प्रदेशात ही घटना घडली आहे. या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याने, संपूर्ण परिसर रिकामा केला गेला आहे. पोलिस आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत व या व्यक्तीची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युक्रेनच्या सरकारी यंत्रणेमुळे संतप्त आहे. आपल्या रागाबद्दल त्याने अनेक वेळा सोशल मीडिया पेजवरही ही माहिती दिली होती.

व्होलिन प्रदेशातील युक्रेन संचालनालयाच्या सुरक्षा सेवेच्या प्रेस सर्व्हिसने सांगितले की, ही बस बेरेस्टेको-क्रॅसिलोव्हका (Berestechko-Krasilovka) मार्गावर धावत होती. माध्यमांच्या वृत्तानुसार घटनास्थळावर बंदुकीच्या गोळीचा आवाजही ऐकायला मिळाला, मात्र, पोलिसांनी अद्याप याबद्दल काहीही सांगितले नाही. याबाबत अध्यक्ष वोल्डीमिर झालेन्स्की (Volodymyr Zelensky) म्हणाले – ‘आरोपीने मंगळवारी सकाळी 9.25 वाजता बस ताब्यात घेतली. या व्यक्तीने गोळ्या चालवल्या आहेत आणि बसचे नुकसान झाले आहे. कोणतीही हानी होऊ न देता परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.’ आता घटनेची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री अरसेन अवाकोव्ह घटनास्थळी दाखल झाले आहेत. (हेही वाचा: University of St Andrews लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात; 20 हून अधिक विद्यार्थिनींनी केले बलात्काराचे आरोप)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रिकाम्या रस्त्याच्या मधोमध उभी असलेली एक छोटी बस दिसत आहे. या बसच्या दोन खिडक्या फुटल्या आहेत तर, इतर खिडक्या पडद्याने झाकल्या गेल्या आहेत. दरम्यान, अजूनतरी या अपहरण कर्त्याच्या मागणीबद्दल काही माहिती मिळू शकली नाही.