Treatment From Female Doctors: 'महिला डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर रुग्णांची जगण्याची शक्यता वाढते'; Annals of Internal Medicine च्या अभ्यासात खुलासा
Doctor प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

याआधी एका संशोधनात समोर आले होते की, स्त्रिया या पुरूषांच्या तुलनेत अधिक मायाळू आणि दयाळू असतात. आता एका नव्या अहवालात म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या रुग्णावर महिला डॉक्टरांकडून (Female Doctors) उपचार होतात तेव्हा त्याच्या जगण्याची शक्यता वाढते. महिला डॉक्टरकडून उपचार घेतल्यानंतर सर्वसामान्यपणे रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल होत नाही किंवा त्याचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होते.

ॲनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये (Annals of Internal Medicine) प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांमध्ये पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार घेतलेल्या रूग्णांपेक्षा कमी मृत्यू आणि रीडमिशन दर आहेत. हा अभ्यास एकूण 7,76,000 रुग्णांवर करण्यात आला, ज्यात 4,58,100 महिला आणि सुमारे 3,18,000 रुग्ण पुरुष होते. या सर्व रुग्णांवर 2016 ते 2019 दरम्यान उपचार झाले होते. हे सर्व उपचार मेडिकेअरने कव्हर केले होते.

अभ्यासातील निष्कर्षानुसार, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर महिला रूग्णांचा मृत्यू दर 8.15 टक्के होता, तर पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर त्यांचा मृत्यूदर 8.38 टक्के होता. तर, महिला डॉक्टरांद्वारे उपचार केल्यावर पुरुष रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 10.15 टक्के होते आणि पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार घेतलेल्या पुरुष रुग्णांचा मृत्यूदर 10.23 टक्के होता.

महिला डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर रुग्णांमध्ये जी सुधारणा झाली ती वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, असे संशोधनात मानले गेले. अहवालानुसार, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, महिला डॉक्टर त्यांच्या रुग्णांना उच्च-गुणवत्तेची काळजी देतात आणि रुग्णांना सामाजिकदृष्ट्यादेखील महिला डॉक्टरांचा फायदा होतो. अशाप्रकारे पुरुष असो वा महिला, येथील प्रत्येक रुग्णाला महिला डॉक्टरांच्या उपचाराचा फायदा झाला आहे. (हेही वाचा: No Age Limit For Health Insurance Plans: आरोग्य विमा नियमांमध्ये मोठे बदल; आता 65 वर्षांवरील लोकही घेऊ शकणार हेल्थ इन्शुरन्स, जाणून घ्या काय आहे नवीन पॉलिसी)

तज्ज्ञांनी सांगितले की, महिला डॉक्टर रुग्णांसोबत जास्त वेळ घालवतात आणि त्यांचे रेकॉर्ड आणि सुधारणेबाबत चांगली काळजी घेतात. महिला डॉक्टरांकडे अधिक चांगली संभाषण कौशल्ये आणि अधिक रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन असू शकतो. 2002 च्या एका वेगळ्या अभ्यासात असे आढळून आले होते की, महिला डॉक्टर या पुरुष डॉक्टरांपेक्षा रुग्णासोबत जास्त वेळ घालवतात.