मार्क झुकरबर्गला मागे टाकत Tesla चे Elon Musk बनले जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या किती आहे संपत्ती
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

स्पेस एक्स (SpaceX) आणि टेस्लाचे (Tesla) प्रमुख असलेले एलोन मस्क (Elon Musk) हे आता जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती (World's Third-Richest Person) बनले आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांनी मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. त्यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून एलोन मस्क हे सतत चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अलीकडेच त्यांच्या रॉकेट कंपनीने अंतराळात चार अंतराळवीर पाठवले आहेत. याशिवाय, इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा समावेश एसएंडपी 500 कंपनीच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. आता ते त्यांच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaire Index) यादीनुसार, जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची मालमत्ता 185 अब्ज डॉलर्स आहे. त्याचप्रमाणे बिल गेट्स 129 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर आता एलोन मस्क आहेत. मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आणि 102 अब्ज डॉलर्ससह बर्नार्ड अर्नाल्ट पाचव्या स्थानी आहेत. (हेही वाचा: Elon Musk ने उठवले COVID 19 Test निकालांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; एकाच दिवसात त्याच्या 4 टेस्टचे वेगवेगळे रिपोर्ट्स)

टेस्लाबद्दलच्या बातमीनंतर एका दिवसात इलोन मस्कच्या संपत्तीत 7.61 अब्ज डॉलर्स (50 हजार कोटींपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर आतापर्यंत त्यांची संपत्ती 82 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. टॉप-500 कोट्याधीशांच्या यादीमध्ये मस्क यांची संपती सर्वाधिक वाढली आहे. वार्षिक मालमत्ता वाढीच्या बाबतीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहेत.

मस्क यांची कंपनी स्पेसएक्सही चांगली कामगिरी करत आहे. रेजिएलंस नावाचे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्ट, फ्लोरिडा येथून चार अंतराळवीरांसह फाल्कन 9 रॉकेटद्वारे लॉन्च झाल्यानंतर एका दिवसांनी यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. हे अभियान नासाच्या 6 प्रमाणित क्रू मिशन पैकी एक आहे आणि स्पेसएक्स एजन्सीच्या व्यावसायिक क्रू प्रोग्रामचा एक भाग आहे. यासह, इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे.