London Bridge video (Photo Credits: Twitter)

ब्रिटनमधील प्रसिद्ध लंडन ब्रिज (London Bridge) परिसरात झालेल्या गोळीबारात आणि चाकूहल्ल्यात (Gunfire And Stabbing) पाच जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी लंडनब्रिजजवळील ही घटना दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी लंडनच्या प्रसिद्ध ब्रिजला वेढा घातला आहे. ब्रिटीश पोलिसांनी शुक्रवारी या घटनेचा हवाला देत, ऐतिहासिक लंडन ब्रिज पूर्णतः रिकामा केला आहे. लोकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नक्की काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लंडन ब्रिज हल्ला (ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतील) -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी झालेल्या चाकूच्या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. याबाबत एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काही लोकांनी या परिसरात गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला आहे. याबाबत स्कॉटलंड यार्डने आपल्या निवेदनात, या घटनेची चौकशी सुरु झाली असून, परिसरातील लोकांनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्याचे पालन करावे असे सांगितले आहे. लंडन ब्रिज अशा भागांपैकी एक आहे जिथे, जून 2017 मध्ये इसिसच्या दहशतवादी हल्ल्यात 11 जण ठार झाले होते. (हेही वाचा: जालना: व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या ४ जणांना अटक)

पोलिसांना दुपारी 1.50 (लंडन वेळेनुसार) वाजता, या परिसरात चाकूहल्ला झाला असल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरु करत एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक एका व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहेत. मात्र अजूनतरी या व्हिडीओची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही ट्वीट करत आपण वेळोवेळी या घटनेची माहिती घेत असल्याचे सांगितले आहे.