सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. नुकतेच पुतीन यांनी सांगितले की, जोपर्यंत कीव मॉस्कोच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत हे युध्द थांबणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये युक्रेनच्या मदतीला अनेक देश धावले आहेत. रशियन सैनिकांचा मागोवा घेण्यासाठी ब्रिटनने नवीन पद्धत अवलंबली आहे. ब्रिटीश इंटेलिजन्स सर्व्हिसने गे डेटिंग अॅप ‘ग्राइंडर’सह (Gay Dating App Grindr) सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करून युक्रेनमधील रशियन हल्ल्याचे निरीक्षण केले. या सोशल नेटवर्किंग साइट्सवर रशियन सैनिकांच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा घेतला जात होता.
युक्रेनच्या सीमेवर रशियन सैनिकांची तुकडी तैनात केली जात होती, तेव्हाच ब्रिटीश हेरांना असे वाटू लागले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन मोठ्या प्रमाणावर युद्धाची तयारी करत आहेत. त्यानंतर ‘ग्राइंडर’चा वापर करून रशियन सैन्यांवर लक्ष ठेवले गेले व त्याची माहिती युक्रेनला शेअर केली गेली.
ब्रिटीश हेरांनी VKontakte सारख्या साइटवरील संदेश टॅप करून पुतिन यांची नेमकी काय योजना आहे याची माहिती मिळवली. VKontakte हे रशियाच्या फेसबुकसारखे आहे. एका सूत्राने सांगितले की, गुप्तचर संदेश केवळ ग्राइंडरसारख्या डेटिंग साइटवर शेअर केले गेले होते. पुतिन यांनी 2013 मध्ये समलैंगिक डेटिंग सर्व्हिसवर बंदी घातली होती, परंतु तरीही लष्करात हे अॅप गुप्तपणे वापरले जाते. या साइट्सवरील माहिती युक्रेनला देण्यात आली आहे जेणेकरून ते रशियाशी लढण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतील आणि या माहितीच्या आधारे युक्रेनला हल्ल्यापूर्वी तयार करता येईल. (हेही वाचा: दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात वेगाने वाढणारे संकट; युक्रेन-रशिया युद्धामुळे 1.5 दशलक्ष निर्वासित शोधत आहेत आश्रय- UNHCR)
रशियाने 11 दिवसांपूर्वी युक्रेनवर हल्ले सुरू केले होते, जे अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या काही हेरांचा दावा आहे की युक्रेनला मदत करण्यासाठी डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून रशियन सैनिकांचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी युक्रेनचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात असल्याचा इशारा दिला. त्यांनी रशियावरील पाश्चात्य निर्बंधांची तुलना युद्धाच्या घोषणेशी केली.