US President Donald Trump यांनी WHO ला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याचे दिले आदेश; चीनमधून कोरोना व्हायरस फैलावाची स्थिती 'Cover Up'केल्याचा जागतिक आरोग्य संघटनेवर  आरोप
डॉनल्ड ट्र्म्प । Photo Credits: Twitter / ANI

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी मंगळवार (14 एप्रिल) दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळाला WHO पुरवली जाणारी आर्थिक रसद थांबवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरात थैमान घातलं आहे. सध्या अमेरिका मध्ये कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्याने आता अखेर राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना व्हायरस सापडल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यात, इतर देशांना त्याची माहिती देण्यामध्ये WHO ची भूमिका यावर आता तपासणी होणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळत चीनला 'कव्हर अप' केल्याचाही दावा केला आहे.

दरम्यान कोरोना व्हायरस जसा फोफावत गेला तसं चीन आणि अमेरिका यांचं पडद्यामागील कोल्ड वॉरदेखील समोर येत गेलं. सुरूवातीच्या टप्प्यात डॉनल्ड ट्र्म्प यांनी अनेकदा कोरोना व्हायरसचा उल्लेख 'चीनी व्हायरस', 'वुहान व्हायरस' असा केला होता. त्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. अमेरिकेमध्ये कोरोनाचे वाढते लोण पाहून या जागतिक आरोग्य संकटात WHO ची भूमिका ही बरीचसी चीनच्या बाजूने झुकलेली पहायला मिळते असा दावादेखील त्यांनी उघडपणे केला होता.

डॉनल्ड ट्रम्प यांचे आदेश

चीन, इटली, स्पेन पाठोपाठ आता अमेरिकेमध्ये कोरोना थैमान घालत आहे. सध्या अमेरिकेमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत बळींचा आकडा 25,000 च्या वर पोहचला आहे. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 594,207 च्या पार गेल्याने आता चिंतेमध्ये भर पडली आहे. अमेरिकेतील न्युयॉर्क आणि न्युजर्सीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 20 लाखांच्या जवळ पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा सव्वा लाखाच्या वर गेला आहे. या आजारातून 4,78,741 लोकं बरी देखील झाली आहेत.