लोकप्रिय कंपनी Johnson and Johnson च्या बेबी पावडरवर जगभरात घातली जाऊ शकते बंदी, जाणून घ्या काय आहे कारण
Johnson And Johnson (Photo Credits-Twitter)

ब्रिटनमधील आघाडीची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) बेबी पावडरच्या (Baby Powder) विक्रीवर जगभरात बंदी घातली जाऊ शकते. कंपनीने 2020 मध्ये यूएस आणि कॅनडामध्ये आपली विक्री आधीच थांबवली आहे. यूएस नियामकांनी दावा केला आहे की, त्यांना कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक सापडले आहेत. या खुलाशानंतर कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंपनीविरुद्ध 34,000 हून अधिक खटले सुरू आहेत. यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचा दावा आहे की त्यांनी कंपनीची बेबी पावडर वापरली आणि नंतर त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला.

दुसरीकडे जॉन्सन अँड जॉन्सनने आपली बेबी पावडर हानिकारक असल्याचे नाकारले आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर अमेरिकेतील उत्पादनाची विक्री घटल्यामुळे त्यांना याची विक्री थांबवावी लागली. Talc हे जगातील सर्वात सॉफ्ट मिनरल आहे आणि ते अनेक देशांमध्ये तयार केले जाते. कागद, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल्ससह अनेक उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पर्सनल हायजीनमध्येही याचा वापर केला जातो. कधीकधी त्यात एस्बेस्टोस असते ज्यामुळे कर्करोगाची शक्यता निर्माण होते.

गार्डियनमधील वृत्तानुसार, जगभरात जॉन्सन अँड जॉन्स पावडरची विक्री थांबवण्यासाठी शेअरहोल्डरच्या व्होट्सची तयारी सुरू आहे. लंडनस्थित गुंतवणूक मंच ट्युलिपशेअरने हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिटी (SEC) कडेही पाठवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये कंपनीच्या वार्षिक बैठकीपूर्वी असे करणे अनुज्ञेय आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे. (हेही वाचा: COVID19 मधून बरे झाल्यानंतर काही दिवस कंबर का दुखते? जाणून घ्या तज्ञांचे याबद्दलचे मत)

कंपनीने अमेरिकन नियामकाला पत्र लिहून शेअरहोल्डरचा ठराव अवैध मानावा अशी विनंतीही केली आहे. कंपनीविरुद्ध जगभरात सुरू असलेल्या खटल्यांवर याचा परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने जगभरात कोट्यवधी डॉलर्सची भरपाई आधीच दिली आहे.