
Boy Dies After Eating Poisonous Berries: आपल्या वडिलांसोबत स्थानिक उद्यानात फिरताना नजरचुकीने विषारी बेरी (Poisonous Berries) खाल्ल्याने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. बेन कुरन-निकॉल्स असे या मुलाचे नाव आहे. तो केवळ 14 वर्षांचा होता. ही घटना 18 सप्टेंबर 2022 रोजी घडली. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बेनचा मृत्यू टॅक्सेन अल्कलॉइड विषबाधामुळे झालेल्या "रीफ्रॅक्टरी कार्डिओजेनिक शॉक" मुळे झाला. सांगितले जाते की, बेरीमध्ये 'टॅक्सेन अल्कलॉइड' अधिक प्रमाणात असते. ज्याचे सेवन केल्याने जीवास धोका निर्माण होतो.
प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, बेन आपल्या वडिलांसोबत नियमीत व्यायामासाठी उद्यानात फिरत होता. ही घटना घडली त्या दिवशी तो उद्यानात एका झाडाजवळ थांबला आणि तेथील बेरीच्या झाडाची एक बेरी तोडून खाल्ली. त्यानंतर तो घरी गेला. मात्र त्याची प्रकृती बिघडली. सायंकाळी 6 च्या सुमारास तर त्याला अधिकच त्रास होऊ लागला. ज्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला आपत्कालीन सेवेद्वारे रॉयल मँचेस्टर चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याला विषबाधा झाल्याचे निदान झाले. 19 सप्टेंबर 2022 च्या पहाटे विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Mumbai: खेळताना चुकून फुगा गिळल्याने 4 वर्षीय मुलाचा मृत्यू; अंधेरी येथील घटना)
टॉक्सिकोलॉजी रिपोर्टमध्ये बेनच्या मृत्यूचे कारण म्हणून "टॅक्सेन अल्कलॉइड विषबाधामुळे रिफ्रेक्टरी कार्डिओजेनिक शॉक" असे सांगितले गेले. अशा प्रकारची विषबाधा दुर्मिळ असली तही या आधीही अशा घटना घडल्याची नोंद अहवालात करण्यात आलीआहे.
मँचेस्टर सिटी कौन्सिलचे सहाय्यक कोरोनर, अँड्र्यू ब्रिजमन यांनी, या वृक्षांशी संबंधित धोक्यांबाबत सार्वजनिक सूचना जारी न करण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. सर्वसाधारणपणे जंगली बेरी आणि पाने खाण्याशी संबंधित संभाव्य जोखमींचा विचार व्हायला हवा. भविष्यातील मृत्यू टाळण्यासाठी पुनर्विचार करण्याची विनंतीही अँड्र्यू ब्रिजमन यांनी केली आहे. मँचेस्टर सिटी कौन्सिल आणि UKHSA दोघांनीही बेनच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. कौन्सिलने प्रकरण गांभीर्याने घेणार असल्याचे म्हटले आहे. तर UKHSA ने कौन्सिलला आपला पाठिंबा दर्शविला आणि कोरोनरच्या शिफारसींना प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.
अमेरिकन बिटरस्वीट ही एक वृक्षाच्छादित वेल आहे. त्याची फळे केशरी-पिवळी असतात. ज्यात प्रत्येक भागामध्ये एक बीज असते. ते ज्या ठिकाणी पाने जोडतात त्या ठिकाणी वाढतात. अमेरिकन बिटरस्वीट बेरी खाल्ल्याने पोटदुखी आणि अतिसार होऊ शकतो. काही प्रमाणात त्यातून विषबाधा होण्याचीही शक्यता असते. या आधी अनेक प्रकरणांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे ही फळे धोकादायक कक्षेत गणली जातात.