Plane Catches Fire Viral Video: उड्डाण भरताना प्रवासी विमानाला आग; 300 प्रवाशांचे प्राण टांगणीला; व्हिडिओ व्हायरल
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

फुकेतहून मॉस्कोला (Phuket to Moscow) जाणाऱ्या एका प्रवासी विमानाला उड्डाण भरताना आग लागली. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तव्हा विमानात 300 प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना घेऊन हे विमान फुकेतहून मॉस्कोला निघाले होते. दरम्यान, फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Phuket International Airport) विमानासोबत 4 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. हे विमान रशियाच्या अझूर एअर (Azur Air) कंपनीचे आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अझूर एअर कंपनीच्या बोईंग 767-300ER विमानाला आग लागली तव्हा विमानात साधारण 300 प्रवासी आणि 12 कर्मचारी होते. रशियन एअरलाइनने माहिती देताना सांगितले की, विमान उड्डाण भरतानाच तातडीने थांबविण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. संभाव्य असलेली मोठी दुर्घटना टळली. बोईंग 767-300ER विमानाच्या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळते की, विमानतळाचा डांबरी रस्ता ओलांडून जाताना विमानाचे पंखे जळताना आणि त्यातून धूर येताना दिसते.

व्हिडिओ

दरम्यान, रशियन एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, एअरलाईन्सने आगोदरच तांत्रिक बीघाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बिघाड दूर करुन विमाना लगेचच (5 फेब्रुवारी) प्रवासी वाहतुकीसाटी खुले करण्यात येईल. हे विमान 26 वर्ष जुने असून 2015 पासून अझूर एअरच्या सेवेत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी साडेचार वाजता घडली. या घटनेनंतर धावपट्टी 40 मिनिटांसाठी ब्लॉक करण्यात आली होती. परिणामी सुमारे 47 विमानांना उशीर झाला. त्यामुळे काही विमाने क्राबी, सामुई आणि बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर रवाना करण्यात आली.