पाकिस्तानचे रेल्वे मंत्री Sheikh Rasheed यांची भारताला धमकी; 'आता भारतासोबत पारंपरिक युद्ध नाही, तर होणार अणुबॉम्ब हल्ला, आमची शस्त्रे तयार'
Pakistan Minister Sheikh Rasheed (Photo Credits: Twitter)

पाकिस्तानचे (Pakistan) रेल्वेमंत्री शेख रशीद (Sheikh Rasheed) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत अनेकदा चर्चेत राहिले आहेत. आता त्यांनी भारताविरूद्ध अणुबॉम्ब (Nuclear War) वापरण्याची धमकी दिली आहे. भारतासोबत चालू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशीद यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानने आपले शस्त्र तयार ठेवले आहे. ते म्हणाले, ‘जर भारताने हल्ला केला तर पारंपरिक युद्ध होणार नाही, तर थेट अणु हल्ला होईल व त्यामध्ये आसामपर्यंतच्या भागाला लक्ष्य केले जाऊ शकते. इम्रान खान मंत्रिमंडळातील हे मंत्री पुढे म्हणाले की, ‘आमची शस्त्रे मुस्लिमांचे प्राण वाचवत अगदी आसामपर्यंत हल्ला करू शकतात.’

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान जागतिक राजकारणाच्या समीकरणाविषयी बोलताना राशिद म्हणाले की, ‘नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशिया या नव्या मित्रांसह नवा ब्लॉक तयार करताना, चीन आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने चीनबरोबर उभे राहिले पाहिज.’ पुढे रशीद म्हणाले, 'जर पाकिस्तानने हल्ला केला तर पारंपरिक युद्धाला वाव नसणार. भारतासोबत हे एक रक्तरंजित, अंतिम आणि एक अणु युद्ध असेल. आमचे शस्त्र हे कॅलक्यूलेटेड, लहान, परिपूर्ण आणि अगदी लक्ष्याला केंद्रित करेल असे आहे, जे अगदी आसाम पर्यंत जाऊ शकते.’ याबाबतचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Facebook सीओओचा इशारा 'Donald Trump यांच्या पोस्ट भडकावू असतील तर हटवल्या जातील')

पहा व्हिडीओ -

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी शेख रशीद यांनी भारताला धमकी देत म्हटले होते की, पाकिस्तानकडे 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅम अणूबॉम्ब आहेत, जे कोणत्याही विशिष्ट लक्ष्यावर हल्ला करू शकतील.' या विधानाबद्दल सोशल मीडियावरही त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती. शेख रशीद यांनी नुकतेच अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भातही एक वक्यव्य केले होते. ते म्हणाले होते की, ‘भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश राहिला नाही, तर तो धर्माचा देश बनला आहे.’ या विधानाला भारतानेही तीव्र प्रत्युत्तर दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, ‘दहशत पसरविणारा देश धार्मिक उन्माद वाढविण्यासारखीच विधाने करू शकतो.’