Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस लसीसंदर्भात (Coronavirus Vaccine) सध्या जगभरात अनेक गोष्टी घडत आहेत. कुठे लस मंजूर झाली आहे, तर कुठे अजूनही ट्रायल सुरु आहेत. काही ठिकाणी तर लसीचा डोसही देण्यात आला आहे. अशात लसीसंदर्भात घडणाऱ्या नकारात्मक घटनाही समोर येत आहेत. ताजे प्रकरण आहे पोर्तुगालचे (Portugal). येथे एका निरोगी महिलेस फायझरच्या कोरोना लसीचा (Pfizer Vaccine) डोस दिला गेला, परंतु दोन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या खळबळजनक बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, या महिलेचे नाव सोनिया एसेवेदो असून ती आरोग्य कर्मचारी होती.

कोरोना लस घेतल्यानंतर सुमारे 48 तासांनंतर, नवीन वर्षाच्या दिवशी सोनियाचा 'अचानक मृत्यू' झाला. महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम लवकरच केले जाईल. दोन मुलांची आई असलेली सोनिया पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी येथे काम करत होती. ही लस घेतल्यानंतर सोनियामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याचे सांगितले जात आहे. सोनियाच्या वडिलांनी पोर्तुगीज वृत्तपत्राला सांगितले, 'माझी मुलगी ठीक होती, तिला कोणताही आरोग्याचा त्रास नव्हता. मुलीने कोरोनाची लस घेतल्यानंतर तिच्यात कोणतेही लक्षणे दिसली नव्हती. काय झाले मला माहित नाही पण माझ्या मुलीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे मला जाणून घ्यायचे आहे.’

वृत्तानुसार, ज्या हॉस्पिटलमध्ये सोनिया कार्यरत होती, त्यांनीही सोनियाच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करत असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाने म्हटले आहे की 30 डिसेंबर रोजी सोनियाला फायझरची कोरोना लस देण्यात आली होती, परंतु तिच्यामध्ये लगेच किंवा काही तासांनंतरही कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. (हेही वाचा: इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, Coronavirus संकटामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची घोषणा)

पोर्तुगालमध्ये सोनियाबरोबरच सुमारे 538 आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना फायझरची लस दिली गेली आहे. त्याचबरोबर पोर्तुगालच्या आरोग्य मंत्रालयालाही मृत्यूच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोर्तुगालची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे व याठिकाणी जवळजवळ 4.27 लाख कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. या ठिकाणी कोरोनामुळे 7,118 लोकांचा मृत्यू झाला आहे.