
जिथे जगभरात बालविवाहाविरोधात (Child Marriage) आवाज उठविला जात आहे, तिथे पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमधून (Balochistan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 62 वर्षीय जमीअत उलेमा-ए-इस्लामचे नेते आणि 'राष्ट्रीय विधानसभा सदस्य’ मौलाना सलाहुद्दीन अयूबी (MP Maulana Salahuddin Ayubi) यांनी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. सलाहुद्दीन बलुचिस्तानमधील चित्रालचे खासदार आहेत. एका स्वयंसेवी संस्थेने या लग्नाची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, मुलीच्या शाळेने तिचे जन्म प्रमाणपत्र माध्यमांसमोर मांडले, त्यात तिची जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 अशी आहे.
अंजुमन दावत-ओ-अझीमात (Anjuman Dawat-o-Azeemat) नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने एका अर्जात मौलाना अयूबीवर आरोप केले की, बलुचिस्तानमधील या खासदाराने आपल्या वयापेक्षा चारपट लहान मुलीशी लग्न केले आहे. ही बातमी सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरली आणि लोक या घटनेबाबत संतापले. स्वयंसेवी संस्थेच्या या आरोपानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. या स्वयंसेवी संस्थेने पोलिसांत तक्रारही दाखल केली. चित्राल पोलिस स्टेशनचे एसएचओ सज्जाद अहमद यांनी सांगितले की, ही मुलगी जुगूरमध्ये असलेल्या शासकीय कन्या हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. (हेही वाचा: पाकिस्तानात 60 वर्षावरील अधिक वय असणाऱ्यांना चीनची सिनोफार्मा लस दिली जाणार नाही)
तक्रार मिळाल्यावर स्थानिक पोलिस चौकशीसाठी जेव्हा मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या वडिलांनी सुरुवातीला मुलीचे लग्न झाल्याचे वृत्त नाकारले. ते म्हणाले की, माझ्या मुलीचे अजूनतरी लग्न झाले नाही. त्यांनतर जेव्हा स्थानिक अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी घटनेची पुष्टी केली. पोलिस डीपीओ म्हणाले की, मुलीच्या वडिलांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे की, ते आपल्या मुलीला 16 वर्षांची होईपर्यंत त्या खासदाराकडे पाठवणार नाही. पाकिस्तानमध्ये मुलींचे लग्नाचे वय 16 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याआधी मुलीचे लग्न झाले तर कायदेशीररित्या तो गुन्हा मानला जाईल आणि यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे.