Machine for Euthanasia: इच्छामरणासाठी बाजारात आले मशीन; एका मिनिटात होणार वेदनारहित मृत्यू, 'या' देशाने दिली कायदेशीर मान्यता
Sarco (Photo Credits: Wikimedia Commons)

आपण लोकांच्या आत्महत्येची (Suicide) अनेक धक्कादायक प्रकरणे वाचली असतील. जीवनाला कंटाळलेले, अंथरुणाला खिळलेले लोक विविध पद्धतींचा अवलंब करून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. अनेक देशंमध्ये इच्छामरणास (Euthanasia) कायदेशीर मान्यता आहे. आता स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) इच्छामरण हवे असेल तर त्यासाठी एक मशीन तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये लोक बसून आपला जीव देऊ शकतात. 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, याला स्विस सरकारकडून कायदेशीर मान्यताही मिळाली आहे. तर तुम्ही अशा थ्रीडी प्रीटेंड कॅप्सूलमध्ये बसून आत्महत्या करू शकता, ज्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला अजिबात वेदना होणार नाहीत.

महत्वाचे म्हणजे अशा मशीनला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. ज्यांना आत्महत्या करायची आहे, त्यांना काही अटींची पूर्तता केल्यानंतर हे सारको पॉड घेऊन जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. स्थानिक मेडिकल रिव्यू बोर्डानेही या मशीनला कायदेशीर मान्यता दिली असून, त्याला सुसाईड पॉड म्हटले जात आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1942 पासून इच्छामरण कायदेशीर आहे आणि केवळ 2020 या एक वर्षांत तब्बल 1300 हून अधिक लोकांनी इच्छामरणा घेतले आहे. इच्छामरण संदर्भातील वकिलांचेही या मशीनला समर्थन मिळाले आहे.

एक्झिट इंटरनॅशनल या एनजीओने ही खास कॅप्सूल तयार केली असून इच्छामरण हवे असलेल्यांसाठी हे तंत्र खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे पॉड बनवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या पॉडला पाहिजे त्या ठिकाणी नेले जाऊ शकते. याचा वापर शवपेटी म्हणूनही करू शकता. या अनोख्या शोधासाठी त्यांना 'डॉक्टर डेथ' असे नाव दिले जात आहे. त्यांचा दावा आहे की कॅप्सूलच्या आत बसलेली व्यक्ती हे मशीन ऑपरेट करू शकते. (हेही वाचा: 'कोरोनापेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असेल पुढे येणारी महामारी'; Covid-19 लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांचा दावा)

मशीनबद्दल माहिती देताना तज्ज्ञांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी वापरकर्त्याला आत बसावे लागते, त्यानंतर त्याची ऑक्सिजन पातळी कमी करता येते. इच्छामरण घेणाऱ्या व्यक्तीला या मशीनमध्ये बसून कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना जाणवणार नाही. आत बसल्यानंतर 30 सेकंदात कोणीही मरू शकतो. कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर पुढील वर्षापासून या विशिष्ट मशीनचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे.