बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खालीदा झिया (file photo)

बांग्लादेशची राजधानी ढाका येथील न्यायालयाने माजी पंतप्रधान खालीदा झिया यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत तब्बल ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. झिया चॅरीटेबल ट्रस्ट भ्रष्टाचाराशी संबंधीत हे प्रकरण आहे. साधारण आठ वर्षांपूर्वी बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या अध्यक्षांविरोधात अॅन्टी करप्शन कमिशन (एसीसी)कडून या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.

एसीसीने खालिदा आणि इतर तिघांवर झिया चॅरीटेबोल ट्रस्टच्या माध्यमातून ३१.५४ मिलियन टका (सुमारे ३,९७,४३५ डॉलर)ची फसवणूक केल्याचा खालीदा झिया यांच्यावर आरोप होता. दरम्यान, २०१०मध्ये जुना ढाका येथील कारागृह परिसरात असलेल्या न्यायालयात खटला सुरु झाला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत खालिदा झिया न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाला त्यांच्या अनुपस्थितीतच खटला चालवावा लागला. (हेही वाचा, पाकिस्तानच्या माजी न्यायाधीशांंकडे 2224 गाड्या, नागरिक पडले बुचकळ्यात)

खालीदा झिया यांना अनाथालय ट्रस्ट प्रकरणात यापूर्वीही ८ फेब्रुवारीदरम्यान, पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या प्रकरणात खालिदा झिया आणि त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमान यांच्यासह पाच लोकांविरुद्ध २००१ ते २००६ या कालावधीत २० मीलियन टका (सुमारे २,५३,१६४ डॉलर) हडप केल्याचा आरोप होता.