धक्कादायक! हैती देशाचे अध्यक्ष Jovenel Moïse यांची घरात घुसून हत्या; फर्स्ट लेडीवरही घातल्या गोळ्या
Jovenel Moise (संग्रहित संपादित प्रतिमा)

कॅरिबियन देश हैतीचे अध्यक्ष (Haiti President) जोवेनेल मोईस (Jovenel Moise) यांची हत्या करण्यात आली आहे. अंतरिम पंतप्रधानांनी ही माहिती दिली. अंतरिम पंतप्रधान क्लेड जोसेफ (Claude Joseph) यांनी म्हटले आहे की बुधवारी सकाळी हा प्राणघातक हल्ला झाला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार राष्ट्रपतींची हत्या त्यांच्या खासगी निवासस्थानी करण्यात आली. काही अज्ञात लोकांनी राष्ट्राध्यक्षांच्या खासगी निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. यातील काही लोक स्पॅनिश बोलत होते. जोसेफ यांनी सांगितले की, देशाच्या फर्स्ट लेडीलाही गोळ्या घालण्यात आल्या, परंतु या हल्ल्यात त्या बचावल्या.

अंतरिम पंतप्रधानांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना घृणास्पद आणि अमानवीय असल्याची त्यांनी म्हटले आहे. यासोबतच जनतेला संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जोसेफ यांनी सांगितले की, देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या फर्स्ट लेडी रूग्णालयात दाखल आहेत व त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही हत्या देशातील राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत घडली आहे. वर्षाच्या सुरुवातीला हैतीमध्ये सरकारविरोधात निदर्शने झाली होती. फेब्रुवारी महिन्यात हजारो लोक मोईस यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालनिषेधार्थ रस्त्यावर उतरले होते.

हैतीमधील विरोधी पक्षाने म्हटले की, मोईस यांचा पाच वर्षांचा कार्यकाल या वर्षी संपुष्टात यायला हवा होता, परंतु मोईस म्हणाले होते की ते आणखी एक वर्ष पदावर राहतील. म्यानमारनंतर फेब्रुवारी महिन्यात हैतीमध्ये तख्तपालट करण्याचा कट रचला होता. त्यावेळीही मोईस यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली होती. मोईस म्हणाले होते की, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला गोता, त्यावेळी त्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी हा डाव उलटून लावला होता.