
सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अनेक देश यावरील औषध व लस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशात अमेरिकेची कंपनी, गिलीड सायन्सेस इंक (Gilead Sciences Inc) यांनी एक दिलासादायक बातमी देत, रेमडेसीवीर (Remdesivir) नावाचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाचा कोरोनाग्रस्त रुग्णांवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. आता कंपनीने रेमडेसीवीरचे दर निश्चित केले आहेत. अमेरिकन सरकार आणि इतर विकसित देशांसाठी, कोरोना व्हायरस ड्रग रेमडेसीवीरच्या एका कुपीसाठी 390 डॉलर्स दर आकारला जाईल. त्यानुसार, उपचारांसाठी 5 दिवसांच्या संपूर्ण कोर्सची एकूण किंमत $ 2,340 (सुमारे 1,75,500 रुपये) असेल.
गिलीडने सोमवारी निवेदन प्रसिद्ध करून याबाबत माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, विकसित देशांसाठी वन प्राइस मॉडेलचा अवलंब केला जात आहे. गिलिडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल ओडे (Daniel O'Day) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'आम्हाला हे औषध रूग्णांपर्यंत पोहोचविण्यात कोणताही अडथळा येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. जगातील सर्व देशांमधील रूग्णांपर्यंत हे औषध पोहोचावे म्हणून ही किंमत सुनिश्चित केली आहे.' (हेही वाचा: जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1.01 कोटी रुग्ण; मृतांचा आकडा 500,000 पेक्षा अधिक)
प्रती बाटली 390 डॉलर अशी ही किंमत सर्व सरकारी घटकांसाठी असेल. इतर खाजगी विमा कंपन्या आणि व्यावसायिक प्लेयर्ससाठी ही किंमत 520 डॉलर प्रती बाटली, म्हणजेच 5 दिवसांच्या पूर्ण कोर्ससाठी $ 3,120 अशी किंमत असेल. कोविड-19 चा उपचार करण्यासाठी रेमडेसीवीरचा वापर सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी घेतल्यानंतरच्या परिणामांवरून असे दिसून आले की, रेमडेसीवीर वापरणार्या रुग्णांची रिकव्हरी वेगाने झाली आहे. या निकालांच्या आधारे, यूएस ड्रग रेग्युलेटरने मे महिन्यात रेमडेसीवीरच्या वापरास मान्यता दिली होती.
आतापर्यंत, गिलीडने जवळजवळ अडीच लाख उपचारांच्या कोर्ससाठी रेमडेसीवीर डोनेत केले आहे. कंपनी सतत आपला पुरवठा वाढविण्यावर काम करत आहे. या वर्षाच्या अखेरीस, कंपनी सुमारे 2 दशलक्ष उपचार कोर्स तयार करणार आहे.