Four-Day Work Week: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 100 कंपन्यांमध्ये आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी
Work (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही महिन्यांमध्ये यूकेची अर्थव्यवस्था (UK Economy) रुळावरून घसरली असल्याचे दिसत आहे. बर्‍याच तज्ञांचा दावा आहे की लवकरच यूकेमध्ये आर्थिक मंदी येऊ शकते. जगातही मंदीची भीती असताना अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अशा परिस्थितीत युकेचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आता ब्रिटनमधील 100 कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.

वाढती महागाई आणि मंदीच्या गर्तेत सापडलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला परत नवसंजीवनी देण्यासाठी, युनायटेड किंगडमच्या 100 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या कंपन्यांनी पगार न कापता सर्व कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून चार दिवस कायमस्वरूपी काम करण्याचा नियम बनवला आहे. या 100 कंपन्यांमध्ये एकूण 2,600 कर्मचारी काम करतात.

कामकाजाच्या 4 दिवसांमुळे देशात मोठे बदल अपेक्षित असल्याचे या कंपन्यांचे मत आहे. येथील काही बँकाही चार दिवस कामकाजाच्या सूत्रावर काम करणार आहेत. आठवड्यातून चार दिवस काम केल्याने कर्मचार्‍यांची उत्पादकता सुधारेल, असा विश्वास 4 दिवस कार्यप्रणालीच्या समर्थकांना आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. यासोबतच कर्मचारी आपल्या कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि याचा फायदा कंपन्यांना होईल. (हेही वाचा: आता गुगलची मूळ कंपनी Alphabet मध्ये कर्मचारी कपात; 10,000 लोकांना काढून टाकण्यात येणार)

विशेष म्हणजे या 100 कंपन्यांपैकी दोन मोठ्या कंपन्या आहेत. अ‍ॅटम बँक आणि एविन ही फर्म अशी या कंपन्यांची नावे आहेत. या दोन कंपन्यांमध्ये एकूण 450 कर्मचारी काम करतात. द गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुख्य कार्यकारी अॅडम रॉस यांनी सांगितले की, त्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील अशी आशा आहे. महत्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल आणि याचा कंपनीला दीर्घकाळ फायदा होईल.

दरम्यान, ब्रिटनच्या या 100 कंपन्यांशिवाय जगातील 70 कंपन्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत 4 दिवस काम करत आहेत. मात्र, अद्याप ही प्रणाली ट्रायल स्वरूपात आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे 3,300 लोक काम करतात. त्याचवेळी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड तसेच बोस्टन विद्यापीठातील संशोधक या विषयावर संशोधन करत आहेत.