गेल्या अनेक दिवसांपासून जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. मेटा, अॅमेझॉन, ट्विटर, सेल्सफोर्स, सिस्कोनंतर आता गुगलची (Google) मूळ कंपनी अल्फाबेट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. असे मानले जाते की कंपनी तिच्या एकूण कर्मचार्यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करू शकते.
एका अहवालानुसार, खराब कामगिरी असलेल्या कर्मचार्यांसाठी गुगल नवीन रँकिंग आणि कार्यप्रदर्शन सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 10,000 कर्मचार्यांना काढून टाकू शकते. नवीन परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून पुढील वर्षाच्या सुरुवातीला अशा हजारो कर्मचाऱ्यांना बाहेर काढले जाईल ज्यांची कामगिरी चांगली नाही. व्यवस्थापक या कर्मचाऱ्यांसाठी रेटिंग वापरू शकतात, जेणेकरून त्यांना बोनस आणि स्टॉक अनुदान द्यावे लागणार नाही.
या नवीन प्रणालीद्वारे ज्यांची कामगिरी चांगली नाही अशा 6 टक्के म्हणजेच 10,000 कर्मचाऱ्यांना वेगळ्या श्रेणीत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अल्फाबेटमध्ये सुमारे 1,87,000 कर्मचारी काम करतात. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (SEC) फाइलिंगनुसार, अल्फाबेटवर काम करणार्या कर्मचार्यांचा सरासरी पगार $2,95,884 आहे. (हेही वाचा: Cisco Layoffs: मेटा आणि ट्विटरनंतर आता सिस्को कंपनीत कर्मचारी कपात; चार हजारांहून अधिक लोकांची जाणार नोकरी)
दरम्यान, 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत, यूएस अर्थव्यवस्थेवरील संकट आणि मंदीमुळे अल्फाबेटचा नफा 27 टक्क्यांनी घटून $ 13.9 अब्ज झाला आहे. तर महसूल 6 टक्क्यांनी वाढून $69.1 अब्ज झाला आहे. अलीकडेच अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले होते की, ते अल्फाबेटला 20 टक्के अधिक कार्यक्षम बनवतील. या वक्तव्याद्वारे त्यांनी छाटणीचे संकेत दिले होते. अहवालानुसार, ज्या लोकांना काढून टाकण्यात आले आहे त्यांना अल्फाबेटने कंपनीमध्ये नवीन पदांसाठी अर्ज करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. गुगलने नवीन नोकरभरतीवरही बंदी घातली आहे.