Politics in Pakistan: परवेज मुशर्रफ यांच्या घरवापसीची शक्यता, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे संकेत
Pervez Musharraf | (Photo Credit - You Tube)

प्रदीर्घ काळ देशाबाहेर असलेले पाकिस्तानचे (Pakistan) माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf ) हे पाकिस्तानला परतण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी शनिवारी तसे संकेत दिले. ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांना आपल्या आयुष्यातील निवृत्तीचा काळ हा प्रतिष्ठेने आणि पूर्ण मानसन्मानाने जगण्यात कोणतीच अडचण असू नये. सन 1999 ते 2008 या काळात पाकिस्तानमध्ये राज्य करणारे मुशर्रफ (78) यांच्यावर राजद्रोहाचा आरोप आहे. घटनाबाह्य वर्तन करण्यासाठी त्यांना 2019 मध्ये मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे. मुशर्रफ हे वैद्यकीय उपचारासाठी 2016 मध्ये दुबईला गेले आहेत. तेव्हापासून ते पाकिस्तानात परतले नाहीत.

मुशर्रफ यांच्या आरोग्याबाबत नुकतीच माहिती पुढे आली. त्यानंतर शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्र्याने प्रथमच मुशर्रफ यांच्याबाबत टिप्पणी केली आहे. आसिफ यांनी ट्विट केले आहे की, 'जनरल मुशर्रफ यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्या घरवापसीबाबत कोणताही अडथळा असू नये. पाठीमागील काही घटनांमुळे त्यात अडथळा येऊ नये. अल्ला त्यांना आराम देओ आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळो. त्यांना निवृत्तीचे आयुष्य आनंदाने व्यक्तीत करता यावे.' (हेही वाचा, पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ जिवंत )

मुशर्रफ यांच्या कुटुंबाने शुक्रवारीच स्पष्ट केले होते की, त्यांची प्रकृती चांगली आहे. ते व्हेंटीलेटरवर नाहीत. परंतू, पाठीमागील तीन आठवड्यापासून रुग्णालयात दाखल आहेत. पाकिस्तानजे माजी जनरल परवेज मुशर्रफ यांच्या मृत्यूच्या बातम्या सोशल मीडियात सातत्याने व्हायरल होत होत्या. त्यावर कुटुंबीयांनी तातडीने स्पष्टीकरण दिले होते. मुशर्रफ यांच्या कुटुंबीयांनी म्हटले होते की, त्यांचा आजार (एमाइलॉयडोसिस) अलिकडील काळात अधिकच गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे पाठिमागील तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. सध्या ते अडचणीच्या काळातून मार्गक्रमण करत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे.