 
                                                                 कोरोना विषाणुने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. तर, 6 लाखांहून अधिक नागरिकांना याची लागण झाली आहे. यातच कोरोनाबाधीत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का लागला आहे. ही घटना मिडलॅंड्स (West Midland) येथे गेल्या काहीच दिवसांपूर्वी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी आलेले 17 जण मृत महिलेच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम मिडलँड्स येथे एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याची समजताच तिला 13 मार्च रोजी बर्मिंघॅमच्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार दरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या 17 लोकांमध्ये कोरोना विषाणूचे लक्षणे आढळून आले आहेत. संबंधित लोकांना कोरोनाची लक्षणे मृतदेहामुळे नव्हेतर, त्यांनी घातलेल्या कपड्यांमुळे होत असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इतरांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या यूके मध्ये जवळपास 20 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर येणाऱ्या काळात या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- Wuhan Deaths Mystery: चीनने लपवली Coronavirus च्या मृत्यूची आकडेवारी? तब्बल 42,000 हजार लोक मरण पावल्याचा स्थानिकांचा दावा
जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
