Coronavirus: Medical workers (Photo Credits: IANS)

चीनच्या (China) वूहान (Wuhan) शहरातून कोरोना व्हायरसने (Coronavirus) जन्म घेतला आणि आता संपूर्ण जग या विषाणूशी लढत आहे. दरम्यान चीनमध्ये या विषाणूचे थैमान कमी झाले असून तिथेले जनजीवन सुरळीत चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचे गूढ वाढत आहे. वुहानमधील स्थानिकांचा असा विश्वास आहे की, कोरोना विषाणूमुळे या ठिकाणी कमीत कमी 42,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापूर्वी चिनी अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की वुहानमध्ये केवळ 3,200 लोक मरण पावले आहेत.

चीनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत देशभरात 3,300 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 81 हजार लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत. यापैकी 3,182 लोकांचा मृत्यू फक्त हुबेई प्रांतात झाला आहे. दरम्यान, वुहानमधील स्थानिक नागरिकांनी असा दावा केला आहे की, आता दररोज 500 अस्थी कलश मृतकांच्या कुटूंबाला दिले जात आहेत. डेली मेलच्या अहवालानुसार हुबेईच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या एका सूत्राने म्हटले आहे की, अनेक नागरिकांचा तपास किंवा उपचार न होताच मृत्यू झाला. एका महिन्यातच तब्बल 28 हजार मृतदेह जाळले गेले आहेत.

(हेही वाचा: अमेरिकेत एका दिवसात कोरोनाबाधित 19 हजार नवे रुग्ण, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लॉकडाउनला विरोध)

हनकाऊ, वूचांग आणि हान्यांग येथे राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे की, 5 एप्रिलपर्यंत त्यांना हे अस्थीकलश दिले जाणार आहेत. डेली मेलच्या अहवालानुसार, याचा अर्थ 12 दिवसांत 42 हजार लोकांचे कलश वाटप केले जाऊ शकते. दुसरीकडे या मृतदेहांना जाळण्याचे काम करणाऱ्या लोकांनाहीही 24 तास कामावर ठेवण्यात आले आहे. जर मृत्यूंचे प्रमाण जास्त नाही तर या लोकांना 24 तास का काम दिले गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशाप्रकारे जर आपण चीनच्या अधिकृत आकडेवारीचा विचार केला तर, इटली आणि अमेरिकेलाही आता चीनला मागे टाकले आहे. इटलीमध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे तर 97 हजार लोक संक्रमित आहेत.