Covid-19 3rd Wave: सध्या जग कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे; WHO ने व्यक्त केली चिंता
WHO Logo (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या दुसर्‍या लाटेनंतर आता तिसर्‍या लाटेबाबत (3rd Covid-19 Wave) चिंता व्यक्त केली जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटबरोबरच (Delta Variant) आता कप्पा प्रकारही वेगाने पसरत आहे. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले आहे की, कोरोना विषाणूचा डेल्टा प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. डब्ल्यूएचओने सर्व देशांना इशारा दिला आहे की, डेल्टा प्रकार सध्या 111 देशांमध्ये पोहोचला असून, लवकरच तो संपूर्ण जगावर आपले वर्चस्व गाजवू शकेल. यासह डब्ल्यूएचओचे प्रमुख Tedros Adhanom Ghebreyesus म्हणाले की, सध्या आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत.

जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे संसर्ग मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेक देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून, जनजीवन सुरळीत होण्याची शक्यता कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी आपत्कालीन समितीला संबोधित करताना सांगितले की, अलिकडच्या काही महिन्यांत युरोप आणि उत्तर अमेरिकेत लसीकरणाचे प्रमाण वाढवून परिस्थिती स्थिर झाली होती. लसीकरण वाढल्याने, कोविड-19 मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण घटत होते मात्र हा ट्रेंड आता उलटत आहे, कारण दुदैवाने आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरवातीच्या टप्प्यात आहोत.

गेल्या आठवड्यापासून हा सलग चौथा आठवडा होता जिथे जगभरात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. दहा आठवड्यांनंतर मृतांचा आकडाही वाढत आहे. गेल्या आठवड्यात संसर्गाच्या घटनांमध्ये सुमारे 10 टक्के म्हणजेच 30 लाखांची वाढ झाली आहे. यापैकी बर्‍याच घटना ब्राझील, भारत, इंडोनेशिया आणि ब्रिटनमध्ये समोर आल्या आहेत. लसीकरणाचे कमी प्रमाण, मास्क न घालणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे तसेच अधिक संसर्गजन्य डेल्टा प्रकारचा वेगाने होणारा प्रसार ही काही प्रकरणांमध्ये वाढ होण्याची कारणे असू शकतात. (हेही वाचा: Sputnik V COVID-19 Vaccine चा एक डोसही उत्तम Antibody तयार करत असल्याचा अभ्यासकांचा दावा)

डब्ल्यूएचओने सांगितले आहे की, मुख्यत्वे ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली नाही अशा लोकांना डेल्टा व्हेरिएंट संक्रमित करीत आहे. तसेच जेथे लसीकरणाचा दर कमी आहे, तिथे परिस्थिती आणखी वाईट आहे. म्हणूनच जे देश निर्बंध उठवून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत आहेत त्याबाबत डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे.