Coronavirus: तबलीगी जमातीच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तानमध्येही हाहाकार; दीड लाख लोक एकत्र जमले, जमातीच्या 500 लोकांना कोरोनाची लागण
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ (Delhi Nizamuddin Markaz) धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या तबलीगी जमातच्या (Tablighi Jamaat) लोकांमुळे भारतातील कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण प्रचंड वाढले. जवळजवळ प्रत्येक राज्यातून तबलीगी जमातीच्या लोकांच्या संक्रमणाच्या घटना समोर येत आहेत. अशात हेच संकट आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) मूळ धरू लागले आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना, गेल्या महिन्यात रायविंड मरकझ येथे वार्षिक जनसंमेलन आयोजित केल्याबद्दल जमातवर टीका होत आहे. 'डॉन'च्या वृत्तानुसार, सरकारचा कडाडून विरोध असूनही जमातने पंजाब प्रांतात 10 मार्च रोजी त्यांचे वार्षिक जनसंमेलन आयोजित केले होते. आतापर्यंत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे 500 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

याबाबत पंजाब प्रांताची विशेष शाखा सांगते की, 10 मार्चच्या कार्यक्रमात या संघटनेचे सुमारे 70,000 ते 80,000 सदस्य एकत्र आले होते. मात्र जमातच्या व्यवस्थापनाने या वार्षिक कार्यक्रमात अडीच लाखाहून अधिक लोकांनी हजेरी लावली असल्याचा दावा केला आहे. या मेळाव्यात 40 देशांमधील 3 हजार लोक सहभागी झाले होते. साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तानने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली आहे, त्यामुळे हे लोक परत जाऊ शकले नाहीत. आता या घटनेमुळे पाकिस्तानमधील कोरोना विषाणूचा धोका कैक पटीने वाढला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा: सौदी अरेबियाच्या राज घराण्यातील 150 लोकांना कोरोना व्हायरसची लागण; सुरक्षेसाठी राजा सलमान, प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने सोडला राजवाडा)

भारतात समोर आलेल्या कोरोना विषाणू प्रकरणांपैकी 30 टक्के रुग्ण हे जमातशी निगडीत आहेत. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिथे 4196 कोरोना विषाणूच्या संक्रमणाची पुष्टी झाली आहे व 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार जमातचे अनेक मोठे प्रचारकही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. याखेरीज सुमारे 20 हजार जमाती नागरिकांना वेगळे ठेवण्यात आले असून, 10 हजाराहून अधिक जणांचा शोध अद्याप सुरू आहे. फक्त पंजाबमध्येच 2100 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.