Covid-19 in China: चीनमध्ये कोरोनाचा कहर; गेल्या सात दिवसांत 13 हजार जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

Covid-19 in China: चीनमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) भयानक रूप धारण केले आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, देशभरात संसर्गाची लाट आधीच शिगेला पोहोचली आहे. चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 12 जानेवारीपर्यंत येथे 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच चीनने हे आकडे जागतिक आरोग्य संघटनेसोबत शेअर केले आहेत. डेटा लपवल्याबद्दल चीनवर जगभरातून टीका होत आहे.

त्याच वेळी, बीजिंगमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शून्य कोविड धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली होती. प्रचंड विरोध पाहता चीनने लॉकडाऊन उठवला होता. कोविड चाचणी आणि प्रवासावरील निर्बंध उठवल्यानंतर लगेचच ओमिक्रॉनचे नवीन उप-प्रकार चीनमध्ये वेगाने पसरू लागला. (हेही वाचा - Intranasal Vaccine in India: भारतीय बनावटीची पहिली नाकावाटे दिली जाणारी लस iNCOVACC 26 जानेवारीला होणार लॉन्च)

चीन सुरुवातीपासूनच कोरोनामुळे मृत्यूची संख्या लपवत आहे. कोरोना महामारी पसरली तेव्हापासून चीनने सांगितले की, येथे फक्त 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात एका दिवसात पाचहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र अंत्यविधीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि हॉस्पिटलमध्ये जमलेली गर्दी काही वेगळेच सांगत आहे.काही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, चीनमध्ये यावर्षी 10 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. ब्रिटिश-आधारित आरोग्य डेटा फर्म एअरफिनिटीचा अंदाज आहे की, या आठवड्यात कोविड मृत्यूची संख्या दिवसाला 36,000 च्या वर जाऊ शकते.

चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू झुन्याओ यांनी 21 जानेवारी रोजी वेइबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, नजीकच्या भविष्यात दुसरी कोविड लाट येण्याची शक्यता नाही. वू म्हणाले की पुढील दोन किंवा तीन महिने कठीण आहेत. कारण 80% लोकांना संसर्ग झाला आहे.