China Coronavirus Vaccine: चीनने जगाला दाखवली आपल्या पहिल्या कोरोना व्हायरस लसीची झलक; जाणून घ्या या लसीच्या चाचणीचे तपशील
Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

चीनच्या (China) वूहान शहरामधून कोरोना विषाणू (Coronavirus) इतरत्र पसरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळू हळू हा विषाणू संपूर्ण जगभर पसरला. अजूनही या विषाणूचा कहर चालूच आहे. अनेक देश या विषाणूवर ठोस लस (Vaccine) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशात चीनच्या कोरोना विषाणू लसची पहिली झलक सोमवारी बीजिंग ट्रेड फेयरमध्ये दिसून आली. यावेळी दोन लसी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली लस ‘कोरोनावॅक' (CoronaVac) ही चिनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने (Sinovac Biotech) तयार केली आहे. ट्रेड फेयरमध्ये ही लस इंजेक्शनच्या स्वरुपात दिसून आली. .

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की ही लस तयार करण्यासाठी फॅक्टरी उभारली जात आहे. त्याद्वारे एका वर्षात 300 दशलक्ष लस तयार केली जाईल. सिनोवॅक बायोटेकचे मुख्य कार्यकारी यिन म्हणतात की, कंपनीतील 90 टक्के कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना ही लस देण्यात आली आहे. आपत्कालीन कार्यक्रमांतर्गत त्यांना ही देण्यात आली आहे. याची सुरुवात जुलैमध्ये झाली होती व अजूनही याची ट्रायल चालू आहे. कोरोनावॅक घेतल्यानंतर आढळलेल्या दुष्परिणामांमध्ये थकवा, ताप आणि वेदना यांचा समावेश आहे, ज्यामध्ये बहुतेक सौम्य लक्षणे आहेत.

दुसरी चीनी औषध कंपनी सिनोफार्मनेही (Sinopharm) आपली लस आणली आहे. सिनोफार्मच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, लसीच्या दोन डोसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. दोन्ही चीनी लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अजूनतरी कोणतीही कोरोना व्हायरस लस बाजारात दाखल झालेली नाही आणि उत्पादकांना या वर्षाच्या अखेरीस आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccine Latest Update: कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स)

दरम्यान, रशियाने कोविड-19 विरूद्ध लसीच्या पहिल्या तुकडीचे उत्पादन सुरू केले आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध जगातील पहिल्या नोंदवलेल्या लसची घोषणा गेल्या महिन्यात राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन केली होती. मात्र, कोरोनापासून बचावासाठी आपली लास प्रभावी आणि पुरेशी सुरक्षित आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही देशाने मोठ्या प्रमाणात तीन टप्प्यातील चाचण्या अजूनतरी केल्या नाहीत.