चायनीज कंपनी सिनोवॅक (Sinovac) यांनी बनवलेली कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) कोरोनावॅक (CoronaVac) ला चीन (China) सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. ही लस 3-17 वयोगटातील मुलांसाठी वापरली जाणार असल्याचे सिनोवॅकचे चेअरमन Yin Weidong यांनी सांगितले. ही लस कधीपासून आपात्कालीन वापरासाठी वापरली जाईल आणि कोणत्या वयोगटातील मुलांना ही दिली जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही असे त्यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना आज (रविवार, 6 जून) सांगितले.
या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल रिसर्च झाले असून या वयोगटातील 100 हून अधिक मुलांना ही लस देण्यात आली होती. या अभ्यासावरुन ही लस अगदी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे दिसून आले, अशी माहिती Yin Weidong यांनी चायना सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV) सोबत बोलताना शुक्रवारी दिली. (China: वुहान लॅबमध्ये तयार झाला Covid-19; अभ्यासामध्ये मोठा खुलासा, शास्त्रज्ञांना कोविड-19 नमुन्यांवर मिळाले 'खास फिंगरप्रिंट्स')
जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या दुसऱ्या कोविड-19 लसीला 1 जून रोजी मान्यता दिली. यामुळे चीनमधील लसीकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. यापूर्वी WHO ने चीनच्या सिनोफॉर्मला मान्यता दिली होती. देशातील अंतर्गत लसीकरणाव्यतिरिक्त इतर देशांनाही लस पुरवठा करण्याचे काम चीन करत आहे.
चीनमध्ये 763 मिलियनहून अधिक कोविड-19 लसीचे डोसेस अजूनपर्यंत देण्यात आल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. अजूनपर्यंत चीनने 5 लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यासाठी WHO ने सुरु केलेल्या कोव्हॅक्स (Covax) सुविधेला चीनने अजूनपर्यंत 10 मिलियन लसींचे डोसेस पुरवले आहेत.