China: वुहान लॅबमध्ये तयार झाला Covid-19; अभ्यासामध्ये मोठा खुलासा, शास्त्रज्ञांना कोविड-19 नमुन्यांवर मिळाले 'खास फिंगरप्रिंट्स'
Deadly Coronavirus (Photo Credits: IANS)

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरस (coronavirus) हा चीनच्या (China) वूहान (Wuhan) येथील प्रयोगशाळेत तयार केला गेला असल्याची चर्चा आहे. याबाबत डब्ल्यूएचओच्या (WHO) टीमने चीनचा दौराही केला होता, मात्र तसे काही पुरावे सापडले नाहीत. आता, चीनमधील शास्त्रज्ञांनीच 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' येथे कोविड-19 व्हायरस तयार केला, असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. अभ्यासात म्हटले आहे की, व्हायरस तयार केल्यानंतर चिनी शास्त्रज्ञांनी त्यास रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनने बदलण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वटवाघूळामधून हा व्हायरस विकसित झाल्याचे दिसेल.

डेली मेलच्या वृत्तानुसार, या पेपरचे लेखक, ब्रिटीश प्रोफेसर अँगस डॅलगिश (Angus Dalgleish) आणि नॉर्वेजियन वैज्ञानिक डॉ. बिर्गर सरेन्सेन (Dr. Birger Sørensen) यांनी लिहिले आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापासून चीनमधील रेट्रो-इंजिनिअरिंगचा प्राथमिक पुरावा आहे, परंतु शिक्षणतज्ज्ञ आणि मोठ्या जर्नलनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता जगभरात पुन्हा एकदा वुहान लॅबमधून व्हायरस लीक झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन डब्ल्यूएचओवर दबाव टाकत आहेत.

समोर आलेल्या अभ्यासामध्ये केलेल्या धक्कादायक आरोपांमध्ये, वुहान लॅबमधील डेटा जाणूनबुजून नष्ट करण्यात आला. तो लपवून ठेवण्यात आला आणि तो गायब करण्याचा प्रयत्न केला गेला. याबद्दल ज्या वैज्ञानिकांनी आवाज उठविला त्यांना चीनने एकतर शांत केले किंवा ते लोक गायब झाले, यांचा समावेश आहे. (हेही वाचा: COVID19 चे महासंकट संपवण्यासाठी 70 टक्के लोकांचे लसीकरण करण्याची गरज, WHO चा दावा)

कोविड-19 च्या उत्पत्ती विषयी झालेल्या नवीन अभ्यासात असा दावा केला आहे की, संशोधकांना विषाणूच्या नमुन्यांमध्ये काही 'वेगळे फिंगरप्रिंट्स' सापडले आहेत, जे फक्त प्रयोगशाळेत हेरफेर केल्यामुळे उद्भवू शकतात. हे फिंगरप्रिंट्स', कोरोना व्हायरस हा वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून लीक झाल्याच्या थेअरीला सपोर्ट करतो. अँगस डॅलगिश व बिर्गर सरेन्सेन म्हणतात, जेव्हा त्यांना हे निकाल जर्नलमध्ये प्रकाशित करायचे होते तेव्हा अनेक वैज्ञानिक नियतकालिकांनी ते नाकारले व या गोष्टीला फेक न्यूज म्हटले. मात्र आता पुन्हा एकदा ही थेअरी प्रकाशझोतात आली आहे.

दरम्यान, या आठवड्यात, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी हा व्हायरस कसा उद्भवला याची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले, त्यामध्ये तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याच्या थेअरीवरही काम करण्यास सांगितले आहे. याआधी व्हाइट हाऊसकडे एक रिपोर्ट पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये म्हटले होते की नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूटमधील अनेक संशोधक आजारी पडले होते व त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.