जर तुम्हीही लहान मुलांना स्मार्टफोन देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवत नसाल, तर ते धोकादायक ठरू शकते. फोनवर सामान्य गोष्टी करताना तुमचे मूल केव्हा शोषणाला बळी पडेल ते तुम्हाला कळणारही नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल थ्रेट असेसमेंट 2023 अहवालातील (Global Threat Assessment 2023) आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. या अहवालानुसार मुलांच्या ऑनलाइन शोषणात मोठी वाढ झाली आहे. इंटरनेटवर बाल शोषण कंटेंटमध्ये 87 टक्के वाढ झाली आहे.
WeProtect ग्लोबल अलायन्सने चौथा ग्लोबल थ्रेट असेसमेंट अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की बाल लैंगिक शोषण सामग्री 2019 पासून 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर बालकांच्या शोषणाच्या 32 दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचा निष्कर्ष असा आहे की, जगभरातील मुलांना या वाढत्या धोक्यापासून वाचवण्यासाठी बहुआयामी प्रतिसाद आवश्यक आहे.
WeProtect ग्लोबल अलायन्सच्या अहवालात असे म्हटले आहे की, मुलांच्या शोषणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 2023 च्या सुरुवातीपासून, गुन्हेगारांनी पीडोफिलिया सामग्री तयार करण्यासाठी आणि मुलांचे शोषण करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर केल्याची प्रकरणे देखील वाढत आहेत. धक्कादायक म्हणजे, अहवालात हे देखील उघड झाले आहे की सोशल गेमिंग प्लॅटफॉर्मवर मुलांशी संभाषण हे अवघ्या 19 सेकंदात उच्च-जोखीम परिस्थितीत बदलू शकते, तर सरासरी हा वेळ फक्त 45 मिनिटे आहे. अशाप्रकारे सामाजिक गेमिंग वातावरण अतिशय धोकादायक होत असल्याचे समोर आले आहे.
या संशोधनात मुलांच्या आर्थिक लैंगिक छळात वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. 2021 मध्ये मुलांकडून खंडणीची 139 प्रकरणे नोंदवली गेली, तर 2022 मध्ये ही संख्या 10,000 पेक्षा जास्त झाली. अशा घटनांमध्ये मुलांचे लैंगिक फोटो आणि व्हिडिओ प्राप्त करणे आणि नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे याचा समावेश आहे. (हेही वाचा: Gujarat Shocker: इंस्टाग्रामवरील मित्राने न्यूड व्हिडिओद्वारे 13 वर्षीय मुलीला केले ब्लॅकमेल, 70,000 रुपयेही उकळले; पोलिसांकडून अटक)
असे लोक 15-17 वर्षे वयोगटातील मुलांशी प्रामुख्याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधतात. त्यानंतर त्यांच्याकडून फोटो, व्हिडिओ प्राप्त करून त्यांना धमकी दिली जाते. अशा घटनांमुळे मुलांनी स्वतःचा जीव घेतल्याचेही समोर आले आहे. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, ऑनलाइन गैरवर्तनाच्या 60 टक्के प्रकरणांमध्ये, अपराधी मुलांच्या ओळखीतली व्यक्ती असण्याची शक्यता होता. म्हणूनच पालकांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून होणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन गैरवर्तनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.