Gujarat Shocker: इंस्टाग्रामवरील मित्राने न्यूड व्हिडिओद्वारे 13 वर्षीय मुलीला केले ब्लॅकमेल, 70,000 रुपयेही उकळले; पोलिसांकडून अटक
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गुजरातमधील (Gujarat) मोरबी (Morbi) येथे एका 13 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला तिच्या इंस्टाग्रामवरील मित्राने ब्लॅकमेल केले, तिला व्हिडिओ कॉलवर कपडे उतरवण्यास भाग पाडले आणि तिच्याकडून 70,000 रुपये घेतले. मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले व त्यानंतर जेव्हा मुलीला खोदून विचारले तेव्हा ही बाब उघडकीस आली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही मुलगी इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकते. पीडितेच्या पालकांनी तीन महिन्यांपूर्वी तिच्यासाठी स्मार्टफोन खरेदी केला होता. या फोनवर मुलीने इंस्टाग्राम अकाउंट बनवले होते. एके दिवशी तिला मित्तल सोलंकी नावाच्या महिलेकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. पुढे या महिलेने पीडितेची ओळख किशन पटेल (19) नावाच्या मुलाशी करून दिली.  पिडीत मुलगी आणि किशनमध्ये हळूहळू मैत्री झाली व गप्पाही सुरु झाल्या.

एके दिवशी पटेलने मुलीला मोरबी येथील एका निर्जन ठिकाणी असलेल्या मंदिरात भेटायला बोलावले. तिथे त्याने तिच्या संमतीशिवाय फोटो क्लिक केले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर फिरविण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने कथितरित्या तिला व्हिडिओ कॉलवर कपडे उतरवण्यास भाग पाडले व तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Kalyan Crime News: कॅबमध्ये तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीला अटक)

त्यानंतर घाबरून मुलीने त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेली 70,000 रुपयांची रोकड व आईचे दागिने चोरले व त्या मुलाला दिले. मुलाने तिला तिचा मोबाईलही देण्यास भाग पाडले. तपास अधिकारी सीएम केरकर यांनी याबाबत माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी पटेलला अटक केली. दरम्यान, सोलंकीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कलम 384 (खंडणी), 354 ए (लैंगिक छळ), 354 डी (सेक्स्टॉर्शन) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.