कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी सोमवारी, 6 जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॅनडामध्ये या वर्षी निवडणुका होणार आहेत. जोपर्यंत पक्ष नवा नेता निवडत नाही तोपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील, असे ट्रूडो म्हणाले. ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर काही तासांनी, अमेरिकेचे अध्यक्ष-निर्वाचित डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्याच्या त्यांच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला. डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रुडो यांच्यात कधीही चांगले संबंध राहिले नाहीत. गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी मार-ए-लागो येथे ट्रुडो यांची भेट झाल्यापासून, ट्रम्प कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्याचा विचार मांडत आहेत. याधीही ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेकदा याचा उल्लेख केला आहे. आता ट्रूडो पायउतार झाल्यानंतर पुन्हा एकदा कॅनडा आणि अमेरिकेच्या विलयाबाबत ट्रंप यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले ट्रंप?
आपल्या सोशल मिडियावर ट्रम्प म्हणाले, 'कॅनडातील अनेकांना त्यांचा देश अमेरिकेचे 51 वे राज्य बनायला आवडेल. यूएसला यापुढे मोठ्या प्रमाणात व्यापार तूट आणि अनुदान परवडणार नाही ज्याची कॅनडाला नितांत गरज आहे. जस्टिन ट्रुडो यांना हे माहीत होते आणि त्यांनी राजीनामा दिला. जर कॅनडा युनायटेड स्टेट्समध्ये सामील झाला तर तेथे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, कर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील आणि त्यांना सतत वेढा घालणाऱ्या रशियन आणि चिनी जहाजांच्या धोक्यापासून ते पूर्णपणे सुरक्षित राहतील. आपण एकत्र आलो तर किती महान देश होईल.’
ट्रम्प यांची कॅनडाला धमकी-
कॅनडाबद्दल बोलायचे तर, ट्रम्प यांच्या ऑफरवर त्यांच्या बाजूने कोणतीही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आलेली नाही. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दक्षिणेकडील सीमा ओलांडून बेकायदेशीर औषधे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रवाह रोखण्यात कॅनडा अयशस्वी झाल्यास, कॅनडाच्या आयातीवर 25 टक्के शुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे. काही पोस्टमध्ये ट्रम्प यांनी ट्रुडोची खिल्ली उडवली आणि त्यांना 'गव्हर्नर ऑफ द ग्रेट स्टेट ऑफ कॅनडा' असे संबोधले. (हेही वाचा: Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार)
दरम्यान, जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याने अधिक अनिश्चित बनली आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांदरम्यान, कॅनडाला आता आपली आर्थिक आणि राजकीय दिशा काय असावी याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. कॅनडा खरोखरच अमेरिकेचे 51 वे राज्य बनू शकेल की ट्रम्प यांचा आणखी एक राजकीय विनोद होता, हे येणारा काळच ठरवेल.