पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा बांगलादेश (Bangladesh) दौरा संपल्यानंतर, तिथल्या हिंदू मंदिरांवर हल्ला आणि देशभर हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारी पूर्व बांग्लादेशातील एका कट्टरपंथी इस्लामी गटाच्या शेकडो सदस्यांनी हिंदू मंदिर आणि रेल्वेवर हल्ला केला अशी माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सने दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश भेटीविरोधात इस्लामिक गटांनी केलेल्या निदर्शनांमध्ये, पोलिसांशी झालेल्या चकमकीत किमान 10 निदर्शक ठार झाले आहेत. पंतप्रधान मोदी परत आल्यानंतर निदर्शनात झालेल्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे.
पंतप्रधान बांगलादेशच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी, शुक्रवारी ढाका येथे दाखल झाले. भेटीदरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना 12 लाख कोविड-19 च्या लसीचा पुरवठा केल्यानंतर पंतप्रधान मोदी भारतात परतले. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पीएम मोदी भारतामध्ये परत आल्यावर बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे. या कट्टरपंथी गटाचा पंतप्रधान मोदींवर आरोप आहे की, भारतातील मुस्लिमांबाबत भेदभाव केला जात आहे.
रविवारी, हिफाजत-ए-इस्लाम गटाने ब्राह्मणबरियाच्या पूर्वेकडील भागात रेल्वेवर हल्ला केला. यामध्ये 10 जण जखमी झाले. या लोकांनी ट्रेनवर हल्ला केला आणि इंजिन रूमसह जवळजवळ प्रत्येक कोच नष्ट केला. यासह अनेक सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आहे. प्रेस क्लबवरही हल्ला झाला आहे आणि त्यामध्ये बरेच लोक जखमी झाले आहेत. प्रेस क्लबचे अध्यक्षही त्यामध्ये सामील आहेत. (हेही वाचा: म्यानमारमधील जनतेसाठी शनिवार ठरला रक्तरंजित दिवस; लष्कराने गेलेल्या गोळीबारात 114 लोकांचा मृत्यू, जगातील अनेक देशांनी केली निंदा)
इस्लामिक आंदोलकांनी रविवारी राजशाहीमध्ये दोन बस पेटवून दिल्या. नारायणगंजमध्ये शेकडो निदर्शकांनी पोलिसांशी भांडण केले आणि त्यांच्यावर दगडफेक केली. निदर्शकांनी लाकूड व वाळूच्या पिशव्यांनी रस्ता बंद केला, त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या सोडल्या. यामुळे नारायणगंज येथे अनेक लोक जखमी झाले. शनिवारीही हजारो इस्लामी कार्यकर्त्यांनी चटगांव आणि ढाकाच्या रस्त्यावर मोर्चा काढला.