ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या खासदाराने प्रवेश केला आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांची युनायटेड किंग्डमच्या गृहसचिवपदी, सुनक मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. सुएला यांनी ईमेल पाठवताना सरकारी नियमांच्या तांत्रिक उल्लंघनाची जबाबदारी घेत सहा दिवसांपूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
सुएला ब्रेव्हरमन यांनी 19 ऑक्टोबर रोजी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत ब्रिटनच्या गृहसचिवपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चिंता व्यक्त केली. (हेही वाचा - Rishi Sunak Sacks Several Ministers: ब्रिटीश पंतप्रधान होताच ऋषी सुनक अॅक्शन मोडमध्ये; अनेक मंत्र्यांना केले बडतर्फ)
त्यांच्या राजीनाम्यामध्ये ब्रॅव्हरमन यांनी सांगितले की, त्यांनी स्थलांतरणावरील लेखी मंत्रिपदाच्या विधानाचा मसुदा पाठवला होता जो छापण्यासाठी गेला होता. आपली चूक लक्षात येताच त्यांनी अधिकृत चॅनेलवर त्याची माहिती दिली. तसेच माझ्याकडून चूक झाली. मी जबाबदारी स्वीकारते आणि राजीनामा देते, असं सुएला ब्रेव्हरमन यांनी सांगितलं होतं.
लिझ ट्रस यांच्या शासन करण्याच्या क्षमतेवर त्यांनी शंका व्यक्त केली होती. यासंदर्भात बोलताना सुएला ब्रेव्हरमन म्हणाल्या की, "आम्ही मतदारांना दिलेली महत्त्वाची आश्वासने मोडली नाहीत. जाहीरनाम्यातील वचनबद्धतेचा सन्मान करण्याच्या या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल मला गंभीर चिंता आहे." या महिन्याच्या सुरुवातीला सुएला ब्रेव्हरमन यांनी सांगितले होते की, भारतासोबत व्यापार करारामुळे युनायटेड किंगडममध्ये स्थलांतर वाढेल. भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी करत असताना त्यांचे हे वक्तव्य आले आहे. भारतीय वंशाच्या ब्रिटिश मंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी ब्रिटिश साप्ताहिक 'द स्पेक्टेटर'ला दिलेल्या मुलाखतीत ही टिप्पणी केली होती.