अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) लवकरच तालिबान (Taliban) आपले सरकार स्थापन करणार आहे. सरकार स्थापनेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, अंतरिम सरकारच्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालिबान काबूलमध्ये सरकार स्थापनेसाठी मोठा सोहळा आयोजित करण्याची तयारी करत आहे. या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तालिबानने चीन आणि पाकिस्तानसह सहा देशांना आमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये तुर्की, कतार, रशिया आणि इराणचाही समावेश आहे. हे सर्व देश तालिबानला सतत पाठिंबा देत आले आहेत. यापैकी कतार वगळता इतर सर्व देशांचे संबंध अमेरिकेबरोबर चांगले नाहीत. आता सरकार स्थापन होत असताना तालिबानने अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांना आमंत्रण पाठवले आहे.
अफगाणिस्तानचा शेवटचा प्रांत पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर तालिबानने ही निमंत्रणे पाठवली आहेत. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, पंजशीर आता तालिबान लढाऊंच्या ताब्यात आहे. मात्र, उत्तर आघाडीने तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे. नॉर्दर्न अलायन्सचे म्हणणे आहे की त्यांची सैनिके पंजशीरच्या प्रत्येक कोपऱ्यात उपस्थित आहेत आणि युद्ध अजूनही सुरू आहे.
तालिबानला मान्यता देणारा चीन हा पहिला देश आहे. तालिबान याला आपला 'बँक बॅलन्स' मानत आहे, कारण चीनने तालिबान सरकारला निधी देण्याची घोषणा केली आहे. चीन, रशिया, तुर्की आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या दूतावासात पूर्वीप्रमाणे काम सुरू ठेवले आहे. मात्र, तालिबानचा भारताशी अद्याप कोणताही अधिकृत संपर्क झालेला नाही.
चीन-रशियासोबत अमेरिकेचे शीतयुद्ध सुरूच आहे. अमेरिका पाकिस्तान-इराणवर अनेक प्रकारचे निर्बंध लादत आले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या काळात तुर्कीबरोबरचे संबंधही ताणले गेले. आता काबूलच्या राष्ट्रपती भवनात तालिबान सरकार स्थापन होणार आहे. मुल्ला बरदार यांना तालिबान सरकारचे प्रमुख बनवले जाऊ शकते, तर मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांना सर्वोच्च नेता बनवले जाऊ शकते. (हेही वाचा: पंजशीरच्या धरतीवर तालिबान्यांचा कब्जा करत फडकवला आपला झेंडा, NRF च्या चीफ कमांडरचा केला खात्मा)
दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी सरकार स्थापनेला पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले की, तालिबान सर्वसमावेशक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला स्वीकारार्ह असे सरकार बनवण्यासाठी लढत आहे. असे मानले जाते की तालिबान पुढील काही दिवसांमध्ये काबूलमध्ये नवीन सरकार स्थापनेची घोषणा करेल.