UAE New President: अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan) यांची शनिवारी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates, UAE) चे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. खलीज टाईम्सच्या वृत्ताचा हवाला देत आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, 61 वर्षीय मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे देशाचे तिसरे राष्ट्रपती असतील.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. ते संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) दुसरे अध्यक्ष होते. शेख यांच्या निधनानंतर यूएईमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह जगभरातील लोकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. (हेही वाचा - UAE चे President Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan यांचे निधन)
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे संयुक्त अरब अमिराती सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर देखील आहेत. शेख मोहम्मद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या फेडरल सुप्रीम कौन्सिलने निवड केली आहे. राजकुमार शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान पुन्हा निवडणुकीसाठी पात्र होण्यापूर्वी पाच वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्रपदीपदाची सूत्रे स्वीकारतील.
दरम्यान, शेख झायेद बिन सुलतान यांनी 1971 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या स्थापनेनंतर 2 नोव्हेंबर 2004 पर्यंत पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर, शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांची उत्तराधिकारी म्हणून UAE चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 1948 मध्ये जन्मलेले शेख खलिफा हे संयुक्त अरब अमिरातीचे दुसरे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे 16 वे शासक होते. शेख खलिफा यांच्या कारकिर्दीत यूएईचा झपाट्याने विकास झाला.