WhatsApp (PC- Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगातील सर्वात मोठे मेसेजिंग ऍप्लिकेशन आहे. 2 अब्जाहून अधिक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. कंपनी वापरकर्त्यांच्या सोयीसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. आता कंपनी आतापर्यंतचे सर्वात मोठे अपडेट आणणार आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर केवळ चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठीच नाही तर कमाईसाठीही करू शकता. अहवालानुसार, व्हॉट्सअॅप त्याच्या स्टेटस आणि चॅनेल विभागांमध्ये जाहिराती समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.

टेकक्रंचच्या अहवालानुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप प्रमुख विल कॅथकार्ट यांनी म्हटले आहे की, लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म स्टेटस, स्टोरीज सारख्या फिचरमध्ये तसेच चॅनेलमध्ये जाहिराती दाखवू शकते. परंतु या जाहिराती मुख्य इनबॉक्समध्ये दाखवल्या जाणार नाहीत. ब्राझिलियन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट म्हणाले की, कंपनीची तुमच्या मुख्य चॅटमध्ये कोणत्याही जाहिराती ठेवण्याची योजना नाही, परंतु इतर ठिकाणी जाहिराती दाखवू शकते.

अशाप्रकारे व्हॉट्सअॅपने जाहिरात येणार असल्याची पुष्टी केली आहे परंतु ती कधी सुरू होईल हे अद्याप सांगितले नाही. सध्या तरी कोणत्याही देशात स्टेटस जाहिरातबाबत चाचणी घेतली जात नाही. याआधी  2019 मध्ये व्हॉट्सअॅपवरील जाहिरातींची बातमी पहिल्यांदा आली होती, परंतु कंपनीने त्याची कधीही अधिकृतपणे याची पुष्टी केली नव्हती. याआधी सप्टेंबरमध्येही, मेटाने एका अहवालाचे खंडन केले ज्यामध्ये दावा केला होता की, कंपनी महसुल वाढवण्यासाठी आपल्या व्यासपीठावर जाहिराती ठेवण्याची योजना आखत आहे. कॅथकार्टने म्हटले होते की हा अहवाल खोटा आहे.

(हेही वाचा: Deepfake Row: डीपफेक व्हिडिओबाबत सरकारचे कठोर पाऊल; दोषी आढळल्यास होऊ शकतो तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड)

मात्र आता कॅथकार्टने याचा स्वीकार केला आहे. नवीन जाहिरात फीचर इन्स्टाग्राम स्टोरीज आणि फेसबुक स्टोरीज प्रमाणेच असेल. म्हणजेच ज्याप्रमाणे इंस्टाग्राम स्टोरीज आणि फेसबुक स्टोरीजमध्ये जाहिराती दिसतात त्याचप्रमाणे त्या व्हॉट्सअॅपमध्येही दिसतील. या सोबतच मेसेजिंग अॅप एकाच वेळी नवीन व्हॉईस मेसेज आणि स्टिकर फिचर देखील विकसित करत आहे. व्हॉट्सअॅप बिझनेसने जागतिक स्तरावर 200 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते ओलांडले आहेत, जे 2020 मध्ये 50 दशलक्ष होते. सुरुवातीला, व्हॉट्सअॅप सर्व खात्यांवर जाहिराती दाखवेल, परंतु भविष्यात, व्हॉट्सअॅपची प्रीमियम सदस्यता देखील सुरू केली जाऊ शकते. ज्या वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त अनुभव हवा आहे त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.