WhatsApp (PC- Pixabay)

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी (Whatsapp Users) एक आनंदाची बातमी आहे. मेटा कंपनीने व्हाट्सएपमध्ये एक नवीन फिचर जोडले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते पासवर्ड किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून विशिष्ट चॅट हे लॉक (Chat Lock) करू शकतील. या फीचरला ‘चॅट लॉक’ असे नाव देण्यात आले आहे. हे फिचर संभाषण लॉक करण्याव्यतिरिक्त चॅट्स वेगळ्या फोल्डरमध्ये संग्रहित करेल. तसेच ते नोटिफिकेशनमधील नाव आणि येणारा संदेशही गुप्त ठेवेल. लॉक केलेल्या चॅट्स ऑथेंटिकेशननंतरच पाहता येतील.

व्हॉट्सअॅपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये चॅट लॉक फीचर सुरू झाल्याची माहिती दिली. व्हॉट्सअॅपमधील नवीन चॅट लॉकमुळे तुमचे संभाषण अधिक खाजगी होईल, असे त्यांनी लिहिले. हे फिचर युजर्सचे संभाषण लपवून ठेवेल.

झुकरबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले की, चॅट लॉक केल्याने तो थ्रेड इनबॉक्समधून बाहेर काढला जातो आणि तो फोल्डरच्या मागे ठेवला जातो, ज्यामध्ये फक्त डिव्हाइस पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट सारख्या बायोमेट्रिकद्वारेच प्रवेश केला जाऊ शकतो. या फीचरच्या गरजेबाबत मार्कने सांगितले की, ज्यांना वेळोवेळी आपला फोन कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करावा लागतो किंवा ज्या लोकांना त्यांचा फोन इतर कोणाशी शेअर करावा लागतो, त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरेल.

हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही फोनवर उपलब्ध असेल. आतापर्यंत, वापरकर्ते बायोमेट्रिक्स किंवा पिन कोड वापरून व्हाट्सएप लॉक करू शकत होते, परंतु नवीन फिचर वापरकर्त्यांना विशिष्ट खाजगी चॅट्सचे संरक्षण करण्यास अनुमती देईल. तुमचा फोन कोणाच्याही हातात पडला तरी, व्हॉट्सअॅपवरील लॉक केलेल्या चॅटची गोपनीयता अबाधित राहील म्हणजेच तो चॅट थ्रेड कोणीही पाहू शकणार नाही. (हेही वाचा: Facebook Friend Requests: फेसबुक पाठवतंय स्वयंचलीत मैत्रीप्रस्ताव; बगबद्दल मेटाकडून दिलगिरी व्यक्त)

दरम्यान, व्हॉट्सअॅपमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेसंदर्भात अनेक फीचर्स आधीच जोडले गेले आहेत. यामध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, एनक्रिप्टेड चॅट बॅकअप, अदृश्य होणारे संदेश, स्क्रीनशॉट ब्लॉक करणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. आता या नवीन अपडेटसह, मेटा कंपनी व्हॉट्सअॅपची गोपनीयता आणि सुरक्षा अधिक मजबूत करू इच्छित आहे. यासाठी सर्वप्रथम, तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही चॅटवर टॅप करावे लागेल. यानंतर, चॅट लॉकचा पर्याय उपलब्ध होईल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे फीचर सक्रिय करू शकता.