Lockdown काळात ऑनलाईन लेक्चर, ऑफिस मीटिंग साठी Zoom App वापरताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी, महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष आवाहन
Zoom (Photo Credits: Play Store)

लॉकडाउन (Lockdown) लागू झाल्यापासून अनेक कंपन्यांना, शिक्षण संस्थांना झूम ऍपचा (Zoom App) मोठा आधार मिळाला आहे. अन्यवेळीस व्हिडीओ कॉल (Video Call) मधून शक्य नसणाऱ्या सर्व सुविधा मिळत असल्याने हे ऍप काहीच आठवड्यात हिट झाले होते. एकीकडे या ऍप्लिकेशनमुळे फायदा होत असताना दुसरीकडे इथूनच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकंना नवे माध्यम मिळत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या 5 लाख वापरकर्त्यांची माहिती यातून गहाळ झाल्याचे तसेच काहींना आर्थिक गंडा घातला गेल्याचे प्रकार झाले आहेत. महाराष्ट्रात अद्याप लॉकडाउन संपण्याचे अजूनही संकेत नसताना तसेच येत्या काळात आता शाळेचे वर्ग सुरु करण्याचे विचार असताना खबरदारीचा पर्याय म्हणून महाराष्ट्र सायबर सेल तर्फे नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. तुम्हीही जर का झूम ऍप वापरत असाल तर एका या सूचना नक्की जाणून घ्या.

Rs 1 Crore Zoom Challenge: लॉक डाऊनच्या काळात भारत सरकार देत आहे तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

Zoom App वापरताना घ्या ही काळजी

- सर्वात मुख्य म्हणजे झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे.

- शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे

- मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत.

-सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल.

-मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा.

-तुम्ही जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटींग चा पर्याय न वापरता एंड मिटींगचा पर्याय वापरा.

दरम्यान, झूम ॲप सदृश काही मालवेअर ऍप्लिकेशन सुद्धा काही ठिकाणि आढळून आली आहेत, हे ऍप जर डाऊनलोड केले, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात. अशावेळी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.