Shocking! आता Apple Watch देखील सुरक्षित नाही? युजरने केला बॅटरीचा स्फोट झाल्याचा दावा
Apple Smartwatch | (Photo Credits: apple.com)

अलीकडेच एलईडी टीव्हीच्या स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. आता हातावर बांधलेल्या स्मार्टवॉचची बॅटरी (Smart Watch Battery) फुटल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्याच्या अॅपल वॉचची (Apple Watch) बॅटरी जास्त गरम झाली आणि नंतर तिचा स्फोट झाला. न्यूज एजन्सी IANS ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, या घटनेची माहिती अॅपलला देण्यात आली आहे.

घडल्या प्रकाराबाबत कंपनीने वापरकर्त्याची कागदपत्रावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला आणि याबाबतची माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. मात्र AppleInsider च्या रिपोर्टनुसार, युजरने डॉक्युमेंटवर सही करण्यास नकार दिला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, यूजरच्या मते त्याच्या Apple Watch Series 7 ने आधी उच्च तापमानाचा इशारा दिला होता. त्याला ऍपल वॉच सामान्यपेक्षा जास्त गरम असल्याचे देखील आढळले. त्याने घड्याळ तपासले असता मागच्या बाजूला भेगा पडल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्याने तात्काळ अॅपल सपोर्टला याची माहिती दिली आणि चौकशीची मागणी केली. ऍपल सपोर्टने वापरकर्त्याला घड्याळाला स्पर्श न करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी घड्याळ वेगाने तापत गेले आणि डिस्प्लेचा चक्काचूर झाला. त्यानंतर घडाळ्यामधून कर्कश आवाज येऊ लागला. वापरकर्त्याने असा दावा केला की, त्याने ते घड्याळ खिडकीतून बाहेर फेकले असता घड्याळाचा स्फोट झाला. वापरकर्त्याला काही शारीरिक इजा झाली आहे की नाही हे अहवालात सांगण्यात आलेले नाही. (हेही वाचा: आता सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी C type चार्जर बंधनकारक, सिंगल चार्जिंग पोर्टसाठी नवीन नियम मंजूर)

या घटनेनंतर त्याने अॅपलला याबाबत संपूर्ण माहिती दिली. घडल्या प्रकाराबाबत कंपनी चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती माध्यमांसमोर येऊ नये म्हणून अॅपलने या युजरला एका दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते, ज्यासाठी त्याने नकार दिला. अहवालात पुढे म्हटले आहे की, कंपनीने डिव्हाईस पिकअपसाठी डिलिव्हरी पिकअपची व्यवस्था केली आहे. जेणेकरून लॅबमध्ये त्याची अधिक चाचणी करता येईल. याआधी मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, अॅपल वॉचची बॅटरी फुटल्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे.