Solar Eclipse 2021: यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 10 जूनला; पहा कसं, कधी, कुठे पहाल?
Surya Grahan (Photo Credits-ANI)

यंदा बुद्ध पौर्णिमेला चंद्र ग्रहण (Chandra Grahan) अनुभवल्यानंतर आता भावुका अमावस्येला भारतामध्ये सूर्यग्रहण (Surya Grahan) आहे. याच दिवशी शनैश्वर जयंती देखील आहे. हे सूर्यग्रहण यंदाच्या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आहे. येत्या गुरूवारी म्हणजेच 10 जूनला हे सूर्यग्रहण आहे पण भारतामधून ते आंशिक स्वरूपात दिसणार आहे त्यामुळे देशभर सर्वत्र यंदा हे पहिलं सूर्यग्रहण दिसणार नाही. सूर्यग्रहण ही एक सामान्य अवकाशीय घटना आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते.

भारताच्या पूर्वोत्तर भागातील काही राज्यात, अरूणाचल, लद्दाख मध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पण प्रामुख्याने हे सूर्य ग्रहण जगात कॅनडा, रशिया, ग्रीनलॅन्ड मध्ये दिसणार आहे. भारतामधून हे ग्रहण दिसणार नसल्याने त्याच्याशी निगडीत धार्मिक मान्यातांना, वेध पाळण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

जगात कुठल्या भागातून दिसणार सूर्यग्रहण

10 जूनचं सूर्यग्रहण हे उत्तर-पूर्व अमेरिका, युरोप, आशिया, अटलंटिक महासागराचा उत्तर भाग येथून भारताप्रमाणेच आंशिक स्वरूपात दिसणार आहे. तर ग्रीनलॅन्ड, रशिया, उत्तर कॅनडा या भागातून ते स्पष्टपणे दिसणार आहे. या भागात सूर्यग्रहणाच्या वेळेस 'रिंग़ ऑफ फायर' देखील स्पष्ट दिसणार आहे.

सूर्यग्रहणाचा भारतीय वेळेनुसार कालावधी

भारतीय वेळेनुसार, या ग्रहणाची वेळ पाहिल्यास या ग्रहणाची सुरूवात दुपारी 1वाजून 42 मिनिटांनी आहे. तर कंकणाचा आरंभ दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आहे. ग्रहणाचा मध्यकाळ 4 वाजून 12 मिनिटांचा आहे. तर कंकण संध्याकाळी 5 वाजून 3 मिनिटांनी संपणार आहे. तर हे ग्रहण संपूर्णपणे संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी संपणार आहे. 10 जूनचं सूर्यग्रहण एकूण 5 तास असेल. नक्की वाचा:  Surya Grahan 2021: यावर्षी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कधी असेल; जाणून घ्या संपूर्ण यादी.

दरम्यान भारतामधून सूर्यग्रहण, रिंग ऑफ फायर थेट दिसणार नसलं तरीही ऑनलाईन तुम्ही ते नक्कीच पाहू शकता.