5 जून ते 5 जुलै दरम्यान येणार वर्षातील 3 ग्रहणं; जाणून घ्या तारीख आणि वेळ
Lunar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Lunar and Solar Eclipse 2020 Date & Time: भारतीय समाजात ग्रहणांसंबंधी अनेक समज-गैरसमज आहेत. परंतु, ग्रहण हा खगोलप्रेमींसाठी उत्सुकतेचा, अभ्यासाचा विषय. यंदा 5 जून ते 5 जुलै दरम्यान वर्षभरातील 3 ग्रहणे येत आहेत. 5 जून आणि 5 जुलै रोजी चंद्रग्रहण असून 21 जून रोजी सूर्यग्रहण असणार आहे. उद्या म्हणजेच 5 जून रोजी असणारे छायाकल्प चंद्रग्रहण हे भारत, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका या देशांमध्ये दिसणार आहे. तर 21 जून रोजी असणारे सूर्यग्रहण भारताच्या उत्तरेकडील भागांतून दिसणार आहे. त्याचबरोबर चीन, पाकिस्तान आणि आफ्रिकेतील काही ठिकाणांवरुन दिसणार आहे. दरम्यान 5 जुलै रोजी येणारे छायाकल्प चंद्रग्रहण देखील  भारत, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका या देशांमध्ये दिसेल. (Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!)

5 जून ते 5 जुलै दरम्यान येणाऱ्या तीन ग्रहणांची तारिख आणि वेळ:

#छायाकल्प चंद्रग्रहण:

उद्या म्हणजेच 5 जून रोजी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतामध्ये 5 जून दिवशी रात्री 11.15 वाजल्यापासून चंद्रग्रहण सुरू होईल ते 6 जूनला 12.54 पर्यंत असेल.

#कंकणाकृती सूर्यग्रहण:

21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा आरंभ सकाळी 9.15 वाजता होईल. दुपारी 3.04 वाजेपर्यंत हे ग्रहण दिसेल.

#छायाकल्प चंद्रहण:

महिन्याभरात येणारे हे तिसरे चंद्रग्रहण असून 5 जुलै रोजी दिसेल. या ग्रहणाचा कालावधी सकाळी 8.37 ते 11.22 असा आहे.

5 जून रोजी असणारे छायाकल्प ग्रहण पाहण्यासाठी Slooh किंवा Virtual Telescope या युट्युब चॅनलला भेट द्या. दरम्यान उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहणे अपायकारक ठरु शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन ग्रहण पाहण्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेऊ शकता.