भाविकांना आता घरबसल्या चार धाम मंदिरातील आरतीचे लाईव्ह पाहता येणार, जिओ लवकरच सुरु करणार थेट प्रक्षेपण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) लवकरच चार धाम मंदिराचे दर्शन घडवणार आहे. तर उत्तराखंड स्थित असलेल्या चार धामसह अन्य प्रमुख मंदिरात होणाऱ्या आरत्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहेत. याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना फायदा होणार असून ज्यांना चार धाम यात्रेला जायची इच्छा आहे पण जाऊ शकत नाही त्यांची मनोकामना पूर्ण होणार आहे. यासाठी जिओ एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करत असून तो उत्तराखंड सरकारसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह धार्मिक स्थळांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

उत्तराखंड येथे प्रत्येक वर्षाला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. परंतु असे काही भाविक आहे त्यांना येथील मंदिरातील देवी-देवतांचे दर्शन घेता येणे शक्य होत नाही. त्यामुळे अशाच भाविकांसाठी राज्य सरकार जिओच्या मदतीने याची ऑनलाईन पद्धतीने व्यवस्था करणार आहे. 2018 मध्ये उत्तराखंड इन्वेस्टर्स समिट पूर्व मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोड शो दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची भेट घेतली होती. त्यावेळी उत्तराखंडसाठी एक नवी कनेक्टिव्हिटी जिओच्या सहाय्याने सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला होता.(केदारनाथ मंदिराचे दरवाजे 26 एप्रिलला भाविकांसाठी खुले करण्यात येणार) 

रिलायन्स जिओने फायबर कनेक्टिव्हीवर काम केले असून ते 89 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. यासाठी मुख्यमंत्री रावत यांनी आभार व्यक्त केले आहे. तसेच चार धाम यात्रेसह अन्य प्रमुख मंदिरांचे लाईव्ह दर्शन सुरु केल्याचे ते जगभरातील सर्वांना पाहता येईल असे ही त्यांनी म्हटले आहे. तर चार धाम यात्रेसाठी येण्यास असमर्थ असलेल्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.