Kedarnath temple Photo Credit: ANI

उत्तराखंड मधील उंच हिमालय क्षेत्रात असलेल्या भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर थंडीच्या दिवसात सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येते. तर आता येत्या 29 एप्रिलला सकाळी 10 वाजता केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराच्या दरवाजे खुले करण्याचा शुभ मुहूर्त आणि वेळ शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त उखीमठ मधील ओमकारेश्वर मंदिरात काढण्यात आला. शीतकालीन प्रवासादरम्यान ओमकारेश्वर मंदिरात भगवान शंकराची पुजा अर्चना केली जाते.

श्री बदरीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष मोहन प्रसाद थपलियाल यांनी असे सांगितले की, केदारनाथ मंदिराचे दरवाजे 29 एप्रिलला खुले करण्यात येणार आहेत. या दिवशी विविध पुजापाठ केल्यानंतर सकाळी 10 वाजल्यानंतर भक्तांना भगवान शंकराचे दर्शन घेता येणार आहे. यापूर्वी 29 जानेवारीला वसंत पंचमी निमित्त बदरीनाथचे दरवाजे खुले करण्याचा मुहूर्त काढण्यात आला होता. 30 एप्रिल रोजी सकाळी 4.30 वाजता बद्रीनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत.(नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणा केलेल्या केदारनाथ गुहेला भाविकांची जोरदार मागणी, प्रशासन उभारणार आणखी एक गुहा)

गढवाल हिमालयातील चार धाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे थंडीच्या दिवसात भरपूर बर्फवृष्टी आणि अतिथंडीमुळे प्रत्येक वर्षात ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये बंद ठेवण्यात येतात. तर पुढील वर्षात एप्रिल-मे या काळात भक्तांसाठी मंदिराजे दरवाजे खुले करण्यात येतात. उत्तराकाशी जिल्ह्यात स्थित गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे प्रत्येक वर्षी अक्षय तृतीयाच्या वेळी उघडले जातात.