नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणा केलेल्या केदारनाथ गुहेला भाविकांची जोरदार मागणी, प्रशासन उभारणार आणखी एक गुहा
Huge Demand For Modi Cave In Kedarnath (Photo Credits: File Image)

केदारनाथ : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केदारनाथ (Kedarnath)  दौऱ्याच्या वेळी संपूर्ण एक रात्र गुहेत बसून ध्यानधारणा केली होती. या गुहेत पंतप्रधानांच्या सोयीसाठी अगदी हायटेक यंत्रणा उभारण्यात आली होती. मोदींच्या दौऱ्यानंतर आता ही गुहा सामान्य भाविकांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या गुहेला भाविकांची दमदार मागणी असून आतापर्यंत 20 जणांनी या गुहेत ज्ञानधारणेचा अनुभव घेतला आहे. भाविकांची मागणी पाहता आता प्रशासन अशाच प्रकारची आणखी एक गुहा उभारण्याच्या विचारात असल्याचे समजतेय. दरम्यान गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी भाविक जोरदार प्री बुकिंग करीत असून पुढील 10 दिवसांसाठी या गुहेची बुकिंग झाली आहे.

जाणून घ्या या गुहेचे फीचर्स 

केदारनाथ मंदिरापासून काहीच अंतरावर समुद्रसपाटीपासून तब्बल 12 हजार फूट उंचीवर एक भला मोठा दगड कापून ही गुहा तयार करण्यात आली होती. या गुहेत पुरेसा प्रकाश येण्यासाठी व समोरच असलेल्या केदारनाथ मंदिराचे सुंदर रूप पाहण्यासाठी एक चौकोनी खिडकी व त्यावर साधारण 10 फूट वर छप्पर अशी गुहेची रचना आहे. गुहेला जोडूनच शौचालय बांधण्यात आले होते. या गुहेत आराम करण्यासाठी एक छोटा पलंग व ध्यान करण्यसाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.

गुहेत जाण्याआधी अशी केली जाते तयारी

बुकिंग केल्याच्या दोन दिवस आधी भाविकांना गुप्त काशीमध्ये पोहोचावे लागते. तिथे त्यांची मेडिकल चाचणी केली जाते. त्यानंतर पायी किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने मंदिरात जाता येते. जिथे गेल्यावर पुन्हा एकदा मेडिकल चाचणी केली जाते. त्यानंतर ध्यानसाधना करण्यासाठी गुहेत जाण्याची परवानगी दिली जाते. गुहेत एका वेळी एकच व्यक्ती राहू शकतो,  या व्यक्तीला काही गरज लागल्यास फोनवरून सांगता येईल. बुकिंग रद्द केल्यास पैसे परत दिले जात नाहीत. गुहेत राहणाऱ्या व्यक्तीला पाणी, चहा, जेवण दिले जाते.

वास्तविक मोदींच्या दौऱ्यांनंतर ही गुहा प्रतिदिन 999 रुपये आकारून भाविकांना उपलब्ध असणार होती पण आता वाढलेली मागणी पाहता भाविक एका दिवसाचे 1500 रुपये द्यायला सुद्धा तयार आहेत. याबाबत अधिकारी बीएल. राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी ध्यानसाधना केल्यानंतर देशभरातून या गुहेला मागणी वाढली आहे. सर्व बुकिंग ऑनलाइन होत आहे. लोकांची मागणी वाढल्याने आता दुसरी एक गुहा बनवण्याचा विचार सुरु आहे. मात्र ही गुहा अद्ययावत असली तरी कृत्रिम नाही त्यामुळे तिच्या उभारणीत काहीसा वेळ लागणार आहे.