Paytm Layoffs: पेटीएममध्ये पुन्हा कर्मचारी कपात; 1 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

Paytm Layoffs: सध्या अनेक कंपन्यांनी पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Staff Reduction) सुरू केली आहे. पेटीएम (Paytm) ची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने संपूर्ण कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या प्रयत्नात विविध विभागांमधील 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे. पेटीएम विविध व्यवसायांचे पुनर्संरचना करण्याच्या प्रक्रियेत आहे. येत्या काही महिन्यांत कंपनी आणखी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पेटीएम कंपनीच्या या निर्णयामुळे 10 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांवर परिणाम होणार आहे.

दरम्यान, 1000 हून अधिक नोकऱ्या कपातीनंतर, Paytm मधील टाळेबंदी ही भारतातील नवीन-युग टेक फर्ममधील सर्वात मोठी टाळेबंदी ठरली आहे. स्टार्टअप कंपन्या या वर्षी भारतभर टाळेबंदीमध्ये आघाडीवर आहेत. निधीची कमतरता आणि कंपनीची आर्थिक पुनर्रचना यामुळे हजारो नोकऱ्या कमी झाल्या आहेत. (हेही वाचा -Google Big Layoff? गुगल लवकरच करणार मोठी कर्मचारी कपात? AI मुळे 30 हजार नोकऱ्या धोक्यात)

पेटीएममधील बहुतेक नोकऱ्या कपात त्याच्या कर्ज व्यवसायातून होण्याची शक्यता आहे, ज्यात गेल्या वर्षभरात वेगाने वाढ झाली आहे. Paytm पोस्टपेड सहसा 50,000 रुपयांपेक्षा लहान कर्ज देते. परंतु लवकरच संपत्ती व्यवस्थापनाकडे मार्गक्रमण करत आहे. तथापि, पेटीएमच्या समभागाला या वर्षी मोठा फटका बसला आहे. यात कंपनीला 7 डिसेंबर रोजी सुमारे 20 टक्के घसरण झाली. कंपनीने पेटीएम पोस्टपेड कर्ज योजना काढणार असल्याची घोषणा केल्यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात -

केवळ पेटीएमच नाही तर नवीन टेक स्टार्टअप्सनी या वर्षी देशभरात सर्वाधिक नोकऱ्या कमी केल्या आहेत. लॉन्गहाउस कन्सल्टिंगच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, नवीन कंपन्यांनी यावर्षी सुमारे 28,000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. (हेही वाचा - Udaan Lay Offs: B2B ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी उडानने 100 हून अधिक कर्मचार्‍यांना दिला नारळ)

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत टाळेबंदीचे दर झपाट्याने वाढले आहेत, कारण 2021 मध्ये या कंपन्यांमधून फक्त 4,080 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच 2022 मध्ये 20,000 लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. याशिवाय 28,000 लोकांपैकी बहुतांश लोकांना केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत काढून टाकण्यात आले होते.