पासपोर्ट व्हेरिफिकेशन, शस्त्रे परवाना तसेच नोकरीदरम्यान तपासले जाणार सोशल मिडिया खाते; Anti-National पोस्ट करणे पडू शकते महागात
Social Media | Representational Image (Photo Credits: Pexels)

सध्या देशातील वातावरण पाहता सोशल मिडिया (Social Media) अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे असल्याचे दिसत आहे. बरेच लोक मागचा पुढचा विचार न करता सोशल मीडियावर पोस्ट करतात, मात्र आता याबाबतीत उत्तराखंडमधील (Uttarakhand) जनतेने जागरुक राहण्याची गरज आहे. कळत-नकळत घडलेली देश विरोधी आणि असामाजिक टीका भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकते. आता उत्तराखंड पोलिस, पासपोर्ट अर्ज आणि शस्त्र परवान्यामध्ये पडताळणीच्या वेळी त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया नोंदींची छाननी करणार आहे. यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्या व्यक्तीचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

इतकेच नाही तर नोकरीसाठी अर्ज करतानाही तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याबाबत उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, सोशल मीडियावर बरेच लोक देशविरोधी टीका करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात. आत्ता पोलिस अशा लोकांवर देखरेख ठेवत आहे. परंतु कधीकधी व्यावहारिक कारणांसाठी अहवाल नोंदवणे शक्य होत नाही, म्हणून, आता अशा प्रकरणांमध्ये, पासपोर्ट पडताळणी आणि शस्त्र परवाना यांचा आधार घेतला जाईल.

अनेकदा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट लिहिल्याचे दिसून येत आहे, आता अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. उत्तराखंड पोलिस सोशल मीडियावर अशा पोस्ट करणार्‍यांवर अधिक कडक कारवाई करतील. यापूर्वी केवळ आयटी कायद्यांतर्गत दावा दाखल करण्यात येत होता, परंतु आता जर कोणी सोशल मीडियावर देशाविरूद्ध काही लिहित असेल तर त्याचा पासपोर्टपासून शस्त्र परवाने, नोकरी यावर त्याचा परिणाम होईल. (हेही वाचा: TikTok चा 'Thank You' नोट सह भारतातील टीमला निरोप; रिलॉन्च करण्याची व्यक्त केली आशा)

डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, जर कोणी पासपोर्ट किंवा शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला तर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचा अहवालही दिला जाईल. जर अर्जदाराकडून अशी कोणतीही पोस्ट किंवा टिप्पणी केली गेली असेल तर त्यावर नकारात्मक अहवाल देऊन त्याचा अर्ज रद्द करण्याची शिफारस केली जाईल.