Swiggy (Photo Credits: PTI)

भारतात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात लोकांना कमीतकमी घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्स किंवा तत्सम गोष्टींचा लोकांना खूप फायदा होत आहे. लोक घरी बसून त्यांना गरजेच्या असलेल्या गोष्टींची ऑर्डर करू शकतात. या प्रकारे विविध वस्तूंपासून, अन्नधान्य, भाजीपाला अशा अनेक गोष्टी आपल्या घरपोच पोहोचत आहेत. आता या प्रक्रियेमध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी स्विगीने (Swiggy) आता अवघ्या 45 मिनिटांत रेशनची होम डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने आपल्या किराणा होम डिलीव्हरी सेवेचे नाव स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) असे ठेवले आहे.

ऑनलाईन शॉपिंग आणि होम डिलिव्हरी पाहता स्विगीनेही या विभागात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सेगमेंटमध्ये स्विगी Flipkart Quick, Big Basket, Dunzo, Grofers शी स्पर्धा करेल. स्विगीच्या मते, ऑर्डर मिळाल्यानंतर 30-45 मिनिटांच्या आत हा माल घरी पोचवला जाईल. ही सुविधा सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत उपलब्ध असेल. स्नॅग्क्स, आईस्क्रीम, इन्स्टंट जेवण, फळ-भाज्या, किराणा वस्तू स्विगी इंस्टामार्ट सेवेद्वारे मागवता येऊ शकतील.

डार्क स्टोअर्सद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माल पोहोचण्याची कंपनीची योजना आहे. त्यात 2,500 हून अधिक वस्तू उपलब्ध असतील. स्विगी मोठ्या प्रमाणावर या विभागात जाण्याची तयारी करत आहे. व्हर्चुअल स्टोअरच्या भागीदारीत स्विगीने ही सेवा सुरू केली आहे. सध्या गुरुग्राममध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा बंगळुरुमध्येही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे स्विगीने सांगितले. कोरोना संकटामुळे स्विगीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. आता किराणा डिलिव्हरीसह कंपनी नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे.