![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/Mark-Zuckerberg-380x214.jpg)
गेले अनेक महिने जगावर मंदीचे सावट आहे, अशात गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसह अनेक टेक कंपन्यांनी विविध टप्प्यांत आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यात मेटा (Meta) नावाचाही समावेश आहे. मेटानेदेखील अनेक फेऱ्यांमध्ये आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आता मेटा कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, कंपनीच्या अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांचा मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg) नेतृत्वावर विश्वास नाही.
मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी आहे आणि मार्क झुकरबर्ग हा कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या कंपनीच्या केवळ एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांचा म्हणजेच 26 टक्के लोकांना मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वावर विश्वास आहे.
सर्वेक्षणानुसार कंपनीमधील तब्बल 74 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना मार्क झुकरबर्गच्या लीडरशिपवर अजिबात विश्वास नाही. हे सर्वेक्षण 26 एप्रिल ते 10 मे दरम्यान, शेवटच्या फेरीच्या टाळेबंदीच्या अगदी आधी केले गेले. याआधी ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हा आकडा 31 टक्के इतका होता. अशा स्थितीत यावर्षी कंपनीच्या सीईओने आणखी 5 टक्के लोकांचा विश्वास गमावला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षापासून 21,000 हून अधिक मेटा कर्मचार्यांना टप्प्याटप्प्याने कंपनी बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला आहे. (हेही वाचा: Byju Layoff: बायजूमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, 1 हजार लोकांचा रोजगार जाणार)
सर्वप्रथम, नोव्हेंबर 2022 मध्ये, कंपनीने खर्च कमी करण्यासाठी 13 टक्के म्हणजेच 11,000 कर्मचार्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर, 2023 मध्ये, कंपनीने एकूण 10,000 कर्मचारी काढण्याची घोषणा केली. ही छाटणी अनेक टप्प्यांत करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण वाढले आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या अंतर्गत सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, या टाळेबंदीमुळे कंपनीचे 74 टक्के कर्मचारी झुकेरबर्गच्या नेतृत्वावर खूश नाहीत.