सध्या ऑनलाईन शॉपिंग साइट आणि मराठी भाषा मुद्दा हा चांगलाच तापला आहे. अशातच शॉपिंग साइट फ्लिपकार्टने (Flipkart) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता फ्लिपकार्टवर मराठी भाषा (Marathi Language) देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना आता फ्लिपकार्टवर शॉपिंग करताना मराठी भाषेचा पर्याय निवडून मनसोक्त खरेदी करता येईल. मराठीसोबत फ्लिपकार्टने अन्य प्रादेशिक भाषेचाही समावेश केला आहे. मराठी भाषा ही भारतातील तिस-या क्रमांकाची बोली भाषा आहे.
फ्लिपकार्टवर मराठीसह हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु या प्रादेशिक भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही खूप आनंदाची बातमी असून याचा खूप फायदा होणार आहे. तसेच ऑनलाईन शॉपिंग करणा-या ग्राहकांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे.
हेदेखील वाचा- MNS Vs Amazon: अॅमेझॉन कंपनी विरोधात मनसेची ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ नवी मोहीम सुरु
वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना वैयक्तिक आणि बोली भाषेतील अनुभव देण्यासाठी 54 लाखांहून अधिक शब्दांचे कंपनीमार्फत भाषांतर आणि लिपित लेखन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स मंचाच्या ‘लोकलायझेशन अॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म‘वर उपलब्ध ही सुविधा ग्राहकांना सहजसुंदर अनुभव देईल, असा विश्वास कंपनीच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
फ्लिपकार्टचे मुख्य अधिकारी (उत्पादन आणि तंत्रज्ञान) जयेंद्रन वेणुगोपाल यांनी सांगितले की, भारतातील ग्राहकांसमीप ई-कामॅर्स अधिक आणणे व त्यात नाविन्यता आणणे या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक भाषांचा व्याप लक्षणीय वाढवला आहे. त्यादृष्टीने आम्ही हे पाऊल उचलले आहे असेही ते पुढे म्हणाले.